Advertisement

टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

आता या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यामुळे आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
SHARES

टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तोपर्यंत स्थगिती देण्यात आली.

महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यामुळे आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून कुठलिही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. मात्र, याबाबत काही गैरसमज झाले असावेत. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

“खरं तर कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हा निर्णय ज्या दिवशी झाला, त्या दिवशी मी जितेंद्र आव्हाड यांचं अभिनंदन केलं होतं. कारण गावाकडून येणाऱ्या रुग्णांची मुंबईत राहण्यासाठी सोय होत नाही. मुंबईतल्या नातेवाईकांनाही आपल्या नातेवाईकांना आपल्या घरी ठेवता येत नाही. अशावेळी हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनीही अशा निर्णयाच्या बाबती संवेदनशीलपणे निर्णय घेण्याची आवश्यकता होती.”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिलीय.

१६ मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्यानं फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या १०० खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता.



हेही वाचा

टाटा रुग्णालयातर्फे फिवर क्लिनीक विभागाचं अनावरण

टाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा