Advertisement

कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - अशोक चव्हाण

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट म्हणणारे देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांनी देशातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - अशोक चव्हाण
SHARES

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्ध्वस्त झालेले शेतकरी देशभर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. पण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट म्हणणारे देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांनी देशातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.


'सरकारच्या चुकीमुळे शेतकरी उद्ध्वस्त'

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत चव्हाण म्हणाले, कृषीमंत्र्यांचं वक्तव्य दुर्देवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. 


'शेतकरी आत्महत्या वाढल्या'

केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांमध्ये 41.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत देशात 44 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रात 15 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशभरात दररोज 35 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. युपीए सरकारच्या काळात 4.2 टक्के असणारा कृषी विकासदर आता 1.9 टक्क्यांवर आला आहे.


'आश्वासनाची पूर्ती नाहीच'

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर दीडपट अधिक हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र गेल्या चार वर्षांत शेतीमालाला हमीभावही मिळत नाही. मोदींनी देशातील उद्योगपतींचे जवळपास अडीच लाख कोटींचे कर्ज माफ केलं. पण संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मात्र दिली नाही. राज्यातल्या भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्याला एक वर्ष झालं. पण अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.


'शेतकऱ्यांचा विश्वासघात केला'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे आणि आता त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करून संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. आगामी काळात देशातील शेतकरी या मस्तवाला सरकारची मस्ती उतरवतील, असं वक्तव्यही चव्हाण यांनी केलं.


हेही वाचा - 

किसान संघर्ष समितीचं १० जूनला 'चक्का जाम' आंदोलन

नाहीतर, शेतकऱ्यांच्या रागाचा वणवा देशभर पसरेल- शरद पवार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा