Advertisement

३२ वर्षांचा पापाचा घडा भरणार, मुंबई महापालिका भाजपच जिंकणार- नारायण राणे

राणे यांनी गुरूवारी दुपारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर, शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळांचं दर्शन घेतलं.

३२ वर्षांचा पापाचा घडा भरणार, मुंबई महापालिका भाजपच जिंकणार- नारायण राणे
SHARES

येणारी मुंबई महापालिका निवडणूक भाजपच जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा भरणार असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. राणे यांनी गुरूवारी दुपारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर, शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळांचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी नारायण राणे म्हणाले, मला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर दीड महिन्यानंतर मी महाराष्ट्रात आलोय. आल्यानंतर सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज विमातळावरील महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालो. अगदी विमानतळापासून ते इथपर्यंत मला जनतेचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तो पाहून मी भारावून गेलो आहे. त्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो. या प्रेमाला न्याय देत मी माझ्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला झुकतं माप देईन. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार- नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल.

हेही वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा

येथील वीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याआधी मी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर नतमस्तक झालो. मला आशीर्वाद द्यायला बाळासाहेब आज हवे होते. मला आयुष्यात जे काही मिळालंय ते साहेबांमुळंच. साहेबांमुळंच मी घडलोय. आज साहेब असते तर मला म्हणाले असते, 'नारायण, तू असंच यश मिळव'. माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. मला आशीर्वाद दिला असता. आज ते नसले तरी त्यांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत असं मला वाटतं,’ असंही राणे म्हणाले. 

नारायण राणेंनी थेट उल्लेख न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, एवढंच सांगेन, कोणत्याही व्यक्तीचं स्मारक असो, दैवतांचं स्मारक असो, त्याला विरोधाची भाषा करू नये. भावनेचा विचार करावा आणि तसं वक्तव्य करावं. कोणाच्या मनात तसं असेल तर स्वत: स्पष्ट बोलावं. डाव्या-उजव्यांना बोलायला लावू नये. जशास तसं उत्तर देण्याबद्दल माझी ख्याती आहे. त्यामुळे कुणीही आपल्यामध्ये मांजरीसारखं आडवं येऊ नये. भाजपने आयोजित केलेली जनआशीर्वाद यात्रा यशस्वी होईल आणि येणारी मुंबई महापालिका भाजप जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा या ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई महापालिका जिंकणं हीच माझी जबाबदारी आहे. फडणवीस, दरेकर अशा सगळ्यांवरच ही जबाबदारी आहे. जबाबदारीचं अद्याप काही ठरलेलं नाही. पण मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा