Advertisement

उर्मिला मातोंडकर करणार शिवसेनेत प्रवेश?

अवघ्या वर्षभराआधी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवून पुढच्या काही दिवसांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

उर्मिला मातोंडकर करणार शिवसेनेत प्रवेश?
SHARES

अवघ्या वर्षभराआधी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवून पुढच्या काही दिवसांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (४६) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोंडकर यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. मात्र भाजपचे तगडे उमदेवार गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकर यांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव केला. काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, कार्यकर्त्यांची न मिळालेली साथ आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. एवढंच नव्हे, तर मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पराभवाची कारणमिमांसा करणारं त्यांनी लिहिलेलं पत्र माध्यमांसमोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.  

हेही वाचा- विधान परिषदेवर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरची शिफारस?

त्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकला असला, तरी त्या अधूनमधून काही महत्त्वाच्या राजकीय-सामाजिक विषयांवर व्यक्त होत होत्या. त्यातच अभिनेत्री कंगना रणौतने कलाकार-ड्रग्ज माफिया कनेक्शन, बाॅलिवूडमधील घराणेशाही आणि मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करून वाद ओढावून घेतल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांसमोर येऊन तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. 

शिवसेना विरूद्ध कंगना अशा वादात उर्मिलाने अप्रत्यक्षरित्या शिवसेनेची भूमिका मांडल्याने शिवसेना पक्षनेतृत्वाने त्यांना पक्षात योग्य संधी देण्याचं ठरवलं असं म्हटलं जात आहे. त्यानुसार विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेने त्यांच्या नावाची शिफारस केली. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्यासोबत चर्चा केली होती. आता शिवसेनेकडून सक्रिय राजकारणात उतरवण्यासाठी उर्मिया यांना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश देणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा