Advertisement

नाहीतर, १० आॅगस्टनंतर रस्त्यावर उतरू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

राज्यातील स्थानिक सार्वजनिक वाहतूक सेवा आणि सर्व प्रकाराची दुकाने कधी सुरू करणार, हे सरकारने स्पष्ट करावं, अन्यथा १० ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य शासनाला दिला आहे.

नाहीतर, १० आॅगस्टनंतर रस्त्यावर उतरू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. दुकाने, बाजारपेठा अजूनही सम-विषम पद्धतीने सुरू असल्याने हातावर पोट असणाऱ्यांपुढं जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच एसटी महामंडळ १० हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याची बातमी समजत आहे. यामुळे बेरोजगारांच्या संख्येत भरच पडणार आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक सार्वजनिक वाहतूक सेवा आणि सर्व प्रकाराची दुकाने कधी सुरू करणार, हे सरकारने स्पष्ट करावं, अन्यथा १० ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य शासनाला दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेलेत. राज्यात दुकानांसाठी अजूनही सम-विषम पद्धत राबवण्यात येतेय. यामुळे छोटे दुकानदार, टपरीवाले, फेरीवाले, हातावर पोट असलेल्या कामगारांची उपासमार होत आहे. जगायचं कसं असा प्रश्न त्यांना आता सतावू लागला आहे. तेव्हा सरकारने दुकानांसाठी लागू असलेली सम-विषम पद्धत कधी बंद करणार हे सांगितलं पाहिजे. 

हेही वाचा - “ही तर नैसर्गिक आपत्ती, मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या”

कोरोनाच्या संकटातही जीवावर उदार होऊन कर्तव्य निभावणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना मागच्या २ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यातच एसटी प्रशासन १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकणार असल्याची माहिती मिळत असेल. तसं असेल तर या बेरोजगारांमध्ये भरच पडणार आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कृती मानकं (एसओपी) तयार करून एसटी महामंडळाच्या सेवेसह विविध महापालिकांच्या अखत्यारीत येणारी  सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार? हे देखील सरकारने स्पष्ट केलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या अनेक भागात पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं फक्त कोरोना-कोरोना म्हणत बसू नका, पुराच्या संबंधित काय उपाययोजना केल्या आहेत त्याचं उत्तर द्या? जातीचा मोठा नेता कोणीही होऊ शकतो, धर्माचा नेताही होऊ शकतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आता लोकांचा नेता होऊन दाखवावं, असा सल्लाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा