Advertisement

अहो आश्चर्यम्, मनसेच्या नगरसेवकांनाच 'खळ्ळ खट्याक'चा कंटाळा?


अहो आश्चर्यम्, मनसेच्या नगरसेवकांनाच 'खळ्ळ खट्याक'चा कंटाळा?
SHARES

मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश करताना ''आपण मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहोत'' असं भावनिक उत्तर या ६ नगरसेवकांनी दिलं असलं, तरी त्यांनी नेमकं कुठल्या कारणासाठी पक्ष सोडला हे एव्हाना जगजाहीर झालं आहे. मात्र या नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांना पक्ष सोडण्यामागे काय कारण दिलंय हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, पण हे कारण वाचून तुम्हा हसू नका, म्हणजे झालं!

 

काय केला दावा?

तर, मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ६ नगरसेवकांचं काय होईल, याचा निर्णय अद्यापही लटकलेला असताना या ६ नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात, मनसेच्या हिंसक आंदोलनामुळे पक्ष सोडत असल्याचा अजब दावा केला आहे. आतापर्यंत 'खळ्ळ खट्याक' ही ओळख अभिमानाने मिरवणाऱ्या नगरसेवकांनीच असा दावा केल्याने कुणालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.


अपात्र होऊ नये म्हणून...

मुंबई महापालिकेतील मनसेच्या ६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनतर शिवसेनेत विलीन होण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र दिलं. मात्र, मनसेने त्यांना गट बनवण्यास हरकत घेत त्या सर्वांना अपात्र ठरवण्याची याचिका केली. त्यावर या सर्वांनी लेखी स्वरुपात पक्ष सोडण्याचं कारण दिलं.


पत्रात नमूद केल्यानुसार...

''फेब्रुवारी ते ९ ऑक्टोबर २०१७ पर्यंत आमचं असमाधान वाढत होतं. आम्हाला पक्षाबद्दल खूप संताप येत होता. जरी आम्ही मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली असली तरी पक्षातील पदे आणि निर्णयांबाबत अस्वस्थता होती. पक्षाच्या हिंसक आंदोलनामुळे आणि राज ठाकरेंनी चिथावणी दिल्याने आम्ही सर्व बाहेर आलो. आम्हाला पक्षाच्या निर्णयात सहभागी करून घेतलं जात नव्हतं'', असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.


'मराठी माणूसच महापौरपदी असावा'

६ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेचे महापालिका गटनेते असलेल्या दिलीप लांडे यांनी, मराठी माणूसच महापौरपदी असावा म्हणून आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र, प्रत्यक्षात पक्ष सोडण्याचं आता वेगळं कारण दिलं जात असल्याने खरं कारण काय? असा प्रश्न जनतेच्या मनात घोळू लागला आहे.


हेही वाचा - 

'त्या' सहा नगरसेवकांना मनसेचा व्हीप

राज ठाकरेंना होती नगरसेवक फुटण्याची भीती?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा