Advertisement

Ram Mandir: तर, अयोध्येत जागा विकत घेऊन बुद्ध विहार बांधू- रामदास आठवले

सरकारकडून जागा मिळाली तर ठिक नाहीतर जागा विकत घेऊन तिथं बुद्ध विहार बांधू, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

Ram Mandir: तर, अयोध्येत जागा विकत घेऊन बुद्ध विहार बांधू- रामदास आठवले
SHARES

अयोध्येत बुद्ध विहार बांधण्यासाठी मी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहे. राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. सरकारकडून जागा मिळाली तर ठिक नाहीतर जागा विकत घेऊन तिथं बुद्ध विहार बांधू, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. (we will try to build buddha vihar in ayodhya says rpi chief ramdas athawale)

अयोध्येत सापडलेले प्राचीन अवशेष हे सिद्ध करतात की या ठिकाणी राम मंदिर किंवा बाबरी मशिदीच्या अगोदर बुद्धांची साकेत नगरी होती. याचे भक्कम पुरावे देखील आहेत. त्यामुळे उत्खननात सापडलेल्या बुद्धकालीन प्राचीन अवशेषांचं जतन करण्यासाठी अयोध्येत मोठं संग्रहालय आणि महाबुद्ध विहार झालं पाहिजे. त्यासाठी सर्व बौद्ध नेत्यांनी गटतट विसरून एकत्र यावं. पक्षीय मतभेद विसरून या प्रश्नावर लढा उभारला पाहिजे, असं आवाहन प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नुकतंच केलं आहे.

अयोध्येत बुद्ध विहार होतं हे सत्य

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना रिपब्लिकन पार्टि आॅफ इंडिया (A)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले की, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी अयोध्येत बुद्ध विहार उभारण्याची मागणी केली आहे. पण मी मागील १० वर्षांपासून ही मागणी करतोय. भारत बौद्धमय असताना अयोध्येचं नाव साकेत नगरी होतं. २ हजार ५०० वर्षांपूर्वी भारत संपूर्ण बौद्ध राष्ट्र होतं. अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिराचे तसंच बुद्ध विहाराचेही अवशेष सापडत आहेत हे सत्य आहे. बाबरी मशीद उभारण्याआधी तिथं राम मंदिर होतं हे सत्य आहे. तसंच राम मंदिर उभारण्याआधी तिथं बुद्ध विहार होतं हेही सत्य आहे. मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार न्यायालयाने निकाल दिला असून त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं आहे. अयोध्येतील मंदिर-मशिदीचा वाद आता कायमचा मिटला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होणार आहे आणि मशिदीलाही जागा देण्यात आली आहे. त्यामुळे वादग्रस्त जागा सोडून अयोध्येत अन्यत्र जमीन घेऊन तिथं भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हेही वाचा - अयोध्येत बुद्ध विहार बांधा, गायक आनंद शिंदेंची मागणी

जागा बघायला जाणार

त्यासाठी मी स्वत: मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन जागेची मागणी करणार आहे. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथं एका ट्रस्ट स्थापन करुन ३० एकर जागा खरेदी करण्यात येईल. राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर मी जमीन पाहण्यासाठी जाणार आहे. चांगली जागा घेऊन तिथं बुद्ध विहार बांधण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

राजकारणाची गरज नाही

त्यांनी पुढं सांगितलं की, आनंद शिंदे यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. पण त्यांनी याप्रश्नी राजकारण आणण्याची गरज नाही. त्यांच्या आवाहनानुसार सगळे नेते एकत्र आले तर ठिकच आहे. परंतु तसं होत नसेल, तर सगळ्या नेत्यांना एकत्र आणून वेळ खर्च करण्यापेक्षा मी स्वत: यामध्ये लक्ष घालेन. ज्यांना मला पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी द्यावा. पण मी जबाबदारी म्हणून अयोध्येत बुद्ध विहार बांधण्याचा प्रयत्न करणार आहे, असा निर्धार देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, पण भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही- राज ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा