Advertisement

राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे म्हणाले...

ते गुरुवारी (२७ जुलै) शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी आयोजित केलेल्या 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टमध्ये बोलत होते.

राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे म्हणाले...
SHARES

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली. याच चर्चेवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसे-ठाकरे गट युतीवर मौन सोडलं आहे.

संजय राऊत यांनी दोन्ही भाऊ एकत्र येतील का? या चर्चेला काही आधार आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, "आधार असता तर चर्चा थांबलीच नसती ना. आपणच म्हणता त्याप्रमाणे चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने कोणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल त्याला आधारा मिळाला नाही म्हणून चर्चा थांबली असेल," असं उत्तर दिलं. 

उद्धव ठाकरेंच्या उत्तरावर संजय राऊत यांनी जर असा एखादा चर्चेचा प्रस्ताव (मनसेकडून) आला तर काय कराल? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर उत्तर देताना, "मी आला तर... गेला तर... यावर कधीच विचार करत नाही. गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्यामुळे आता तशी काही चर्चा नाही. त्यामुळे त्यावर बोलण्याची काही आवश्यकता नाही," असं सूचक विधान उद्धव यांनी केलं.

"महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्याचंच रूपांतर आता देशभरात ‘इंडिया’ नावानं झालं आहे. इतर राज्यांतले जे प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस हा मोठा पक्ष असून आता इतर पक्ष त्यात सामील झाले आहेत. कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी 'इंडिया' गटाचं समर्थन केलं. 

भाजपावरही उद्धव यांनी निशाणा साधला. "ते असं म्हणतात की परिवार वाचवणारे सगळे विरोधक तिकडे एकत्र आले आहेत. मग तुम्ही सत्ता वाचवायला एकत्र आलात का?" असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

"जसं बंगळुरूला परिवार वाचवण्यासाठी ही लोकं एकत्र आली असं त्यांचं म्हणणं आहे. मी ठामपणे म्हणतो, होय... परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोत. माझा देश माझा परिवार आहे. हेच माझं हिंदुत्व आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना मी कोविड काळात राबवली होती. तीच आज देशभरात राबवण्याची वेळ आली आहे, की ‘माझा देश माझी जबाबदारी’ आहे," असं उद्धव यांनी म्हटलं.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा