उद्धव आणि राणे एकत्र येण्याचा `योग` २३ जूनला ?

 Mumbai
उद्धव आणि राणे एकत्र येण्याचा `योग` २३ जूनला ?

'त्या' दोघांनाही एकमेकांचा चेहरा पहायला आवडत नाही. एकाचा नामोल्लेख झाला तर दुसरा शेलक्या शिव्या देणार आणि दुस-याच्या नावासरशी पहिल्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरणार. विरुद्ध दिशेनं मोहरा फिरवून बसणारे ‘ते’ राजकीय वैरी एकाच व्यासपिठावर दिसणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेता नारायण राणे. खरं वाटत नसलं तरी तूर्त विश्वास ठेवावाच लागेल. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपिठावर एकत्र येण्याचा योग येत्या 23 जूनला जुळून येऊ शकतो. स्थळः सिंधुदुर्ग. निमित्त- मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीस, गडकरी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेता नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्या नावाचाही समावेश आहे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकासुद्धा 'मुंबई लाइव्ह'पाशी आहे.राजशिष्टाचारानुसार, कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्यातले आमदार म्हणून नितेश राणे आणि विधान परिषद सदस्य नारायण राणे यांच्याही नावाचा समावेश आहे. आता या निमंत्रणाचा मान ठाकरे आणि राणे राखणार का? हा मोठा प्रश्न आहे. 39 वर्ष शिवसेनेत विविध पदं भूषवणा-या नारायण राणे यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हकालपट्टी केली. त्यानंतरच्या तेरा वर्षांत म्हणजे आजतागायत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र दिसले नाहीत. काही प्रसंगी असा योग जुळून येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण वेळीच संबंधितांनी खबरदारी घेऊन संभाव्य अपघात टाळला.


कुडाळमध्ये होणा-या या कार्यक्रमाला ठाकरे आणि राणे दोघंही उपस्थित राहतील का?  हा कळीचा प्रश्न आहे. राणे नक्की उपस्थित राहणार, हे लक्षात घेऊन उद्धव कार्यक्रमाकडे न फिरकण्याचा पर्याय कदाचित अवलंबतील. पण कोकणात शिवसेनेचा जनाधार लक्षात घेता तसं करणं शिवसेनेसाठी तोट्याचा सौदा ठरेल. उद्धव यांचा प्रतिनिधी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू शकतो किंवा नारायण राणे स्वतः गैरहजर राहून आमदार पुत्र नितेशला स्वतःचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाला पाठवण्याचा तुलनेनं सौम्य मार्ग अवलंबू शकतात.आता सर्वात महत्त्वाची शक्यता!  ठाकरे आणि राणे दोघंही एकाच मंचावर उपस्थित राहिले तर...! असं घडलं तर शिवसैनिक विरुद्ध राणेसमर्थक काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात राडा ठरलेलाच आहे. उद्भवणारी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन, सुरक्षा यंत्रणेवर याचा प्रचंड ताण येऊ शकतो. मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि राणे समर्थक काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्यास तळकोकणात ऐन पावसाळ्यात राजकीय शिमगा रंगणार, हे निश्चित.


काय घडू शकतं?

  • उद्धव ठाकरे कार्यक्रमाकडे पाठ फिरवतील. उद्धव यांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
  • नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांचा सामना टाळतील. त्याऐवजी राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे उपस्थिती नोंदवतील.
  • ठाकरे आणि राणे कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
  • उद्धव आणि राणे एकाच मंचावर आल्यास शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये ‘राडा’.
  • सिंधुदुर्गात राडा झाल्यास पोलिसांची कसोटी. उद्धव ठाकरे किंवा नारायण राणे अनुपस्थित राहिल्यास सुंठीवाचून खोकला गेल्याचं पोलिसांना समाधान.Loading Comments