वरळीत शाखाप्रमुख निवडीवरून शिवसैनिकांनी विभागप्रमुखलाच घेरले


SHARE

वरळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्या नेमणुकांवरून चांगलाच वाद पेटला आहे. गेली 19 वर्षे शाखाप्रमुख असलेल्या राजेश कुसळे यांना डावलून शाखा क्रमांक 199च्या शाखाप्रमुखपदी गोपाळ खाडे यांची नेमणूक केली आहे. या नेमणुकीला कुसळे समर्थक तसेच स्थानिक शिवसैनिकांनी तीव्र विरोध केला. तसेच खाडे यांना या शाखेत प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्धारच त्यांनी केला आहे.


राजेश कुसळे यांना पदावरून हटवल्याने समर्थ नाराज

मुंबईतील अनेक शाखांचे शाखाप्रमुख बदलण्यात आले असून वरळी विधानसभेत शाखाप्रमुख राजेश कुसळे यांना पदावरून हटवल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये रोष पसरला आहे. महापालिका निडणुकीत कुसळे यांनी प्रभाग क्रमांक 199 मधून आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु, तिथे महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली होती. किशोरी पेडणेकर निवडून आल्यानंतर कुसळे यांची बेस्ट समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे पेडणेकर यांनीच कुसळे यांना हटवून खाडे यांना 199 च्या शाखाप्रमुखपदी आणण्याचा घाट घातल्याचे समजते.


...यांना शाखेबाहेर रोखून धरले

कुसळे यांना हटवून खाडे यांची नियुक्ती केल्याने स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. विभागप्रमुख, नगरसेवक आशिष चेंबूरकर यांना कुसळे समर्थकांनी शाखेबाहेर रोखून धरले. चर्चेने वाद सोडवण्याचे पक्षनेतृत्वाचे कुसळे समर्थकांना आश्वासन दिले असले तरी वाद सोडवला जात नाही, तोपर्यंत नव्या नवनियुक्त शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांना शाखेत येऊ देणार नाही, असा निर्धार कुसळे समर्थकांनी केला आहे.

कुसळे यांना गेल्या महापलिका निवडणुकीतही डावलले होते. त्याचाही समर्थकांमध्ये राग आहे. त्यांच्याऐवजी विभागाबाहेरच्या किशोरी पेडणेकर यांना संधी दिली होती. आता तर त्यांना शाखाप्रमुख पदावरून हटवून एकप्रकारचा डाव साधला जात असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून ऐकायला मिळत आहे. गेली 19 वर्षे शाखाप्रमुख असलेल्या कुसळे यांना पदावरून का हटवले याचे उत्तर पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या समर्थकांना हवे आहे.


हेही वाचा - 

मिशन पालिका निवडणूक

संबंधित विषय