माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पूत्र युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील उत्तर मध्य मुंबईतून आणि उत्तर पश्चिममधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वातावरणात सुरू होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढण्याच्या वृत्ताचं खंडन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. यामध्ये वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना, चांदिवली या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. तसंच, उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे असून, यामध्ये दिंडोशी, अंधेरी पश्चिम, गोरेगाव, अंधेरी पूर्व, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. सध्या उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन खासदार आहेत, तर उत्तर पश्चिममध्ये गजानान कीर्तीकर खासदार आहेत.
ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवलेली नाही. असं असलं, तरी आदित्य ठाकरे यांनी मुंबई जिल्हा फुटबाॅल असोसिएशनची निवडणूक जिंकली होती. एवढंच नाही, तर तरुण मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देणं, शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लास रुम सुरू करणं, ओपन जिम तसंच मुंबईत स्वच्छ शौचालय सुरू करणं ही त्यांची कामे चांगलीच गाजली आहेत. त्यामुळे आदित्य उत्तर मध्य मुंबई किंवा उत्तर पश्चिम या लोकसभा मतदार संघातून उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांनी या वृत्ताचं खंडन केल्याने अफवांचा धुरळा खाली बसला आहे.
हेही वाचा -
मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेत
पावसाळ्याआधी सुरू होणार सांताक्रूझचं गझदरबंध पम्पिंग स्टेशन