डिम्ड कन्व्हेयन्स न करणाऱ्या बिल्डरला दणका

 Pali Hill
डिम्ड कन्व्हेयन्स न करणाऱ्या बिल्डरला दणका

मुंबई - सोसायटीचे कन्व्हेयन्स करून देणं कायद्यानं बंधनकारक आहे. डिम्ड कन्व्हेयन्ससारखा कायदा अस्तित्वात असतानाही अनेक बिल्डर अजूनही कन्व्हेयन्स करून द्यायला टाळाटाळ करतात. अशाच एका बिल्डरला नुकताच वांद्र्यातील अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला आहे. कन्व्हेयन्स करून न देणाऱ्या मेसर्स एनजी बिल्डर्सला तीन लाखांचा दंड ठोठावला असून चार महिन्यात ही रक्कम सोसायटीला अदा करण्याचे आदेश दिल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. मिथील संपत यांनी दिली आहे.

वर्सोव्यातील अवर स्काय हेवन सोसायटीचे कन्व्हेयन्स करून देण्यास बिल्डर अनेक वर्षांपासून टाळाटाळ करत होता. त्यामुळे सोसायटीनं मंचाकडे धाव घेतली आहे. त्यानुसार नुकताच मंचानं बिल्डरला तीन लाखांचा दंड करत चार महिन्यात रक्कम भरण्यासह चार महिन्यांत कन्व्हेयन्स करून देण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दंडाच्या रक्कमेवर आदेश लागू झाल्याच्या दिवसापासून रक्कम देईपर्यंत 9 टक्के व्याजही देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत. या आदेशामुळे सोसायटीला दिलासा तर मिळाला असून कन्व्हेयन्स करून न देणाऱ्या इतर बिल्डरांना यामुळे चाप बसेल असा विश्वास मिथील संपत यांनी व्यक्त केला आहे.

Loading Comments