जीव्हीके आता गावठाणही गिळंकृत करणार?

 Mumbai
जीव्हीके आता गावठाणही गिळंकृत करणार?

सहार - विमानतळ सुशोभिकरण आणि विस्तारीकरणाच्या नावाखाली जीव्हीके, एमएल आणि एमएमआरडीएने सहार गावातील सुतार पाखाडी गावठाणातील मैदान, रस्ते याआधीच गिळंकृत केले आहेत. आता येथील पायवाटही घशात घालण्याचा डाव यांनी आखला आहे. पण गावकऱ्यांनी हा डाव हाणून पडला आहे. असे असताना आता जीव्हीकेने चक्क तीन गावठाण गिळंकृत करायचा नवा डाव आखला आहे. सुतार पाखाडी, टँक पाखाडी आणि अवर लेडी ऑफ हेल्थ अशा तीन गावठाणांना जीव्हीकेने नोटिसा पाठवल्या आहेत. भूसंपादन सर्वेक्षणासाठी या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण असल्याची माहिती वॉचडॉग फाऊंडेशनचे ट्रस्टी आणि माजी नगरसेवक निकोलस आल्मेडा यांनी दिली आहे. दरम्यान स्काय सिटीच्या नावाखाली हा डाव आखल्याचेही आल्मेडा यांनी सांगितले आहे.

6 फेब्रुवारी, सोमवारी सकाळी गावकऱ्यांच्या हातात या नोटिसा पडण्यास सुरुवात झाली आहे. या नोटिसनुसार 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान हे सर्वेक्षण केले जाणार आहे. भूसंपादनासाठी हे सर्वेक्षण असल्याने गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपल्याला हद्दपार करण्याचा डाव जीव्हीकेने आखला आहे या विचारानेच गावकरी हवालदील झाले आहेत.

‌भूमीपूत्रांना आणि त्यातही ख्रिस्ती बांधवाना मुंबईतून हद्दपार करायचा हा डाव असल्याचा आरोप आल्मेडा यांनी केला आहे. त्यामुळे आता देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही आल्मेडा यांनी दिला आहे. तर 8 मार्चला एकालाही सर्वेक्षणासाठी पाऊल ठेऊ देणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता हा वाद चांगलाच पेटणार आहे.

Loading Comments