Advertisement

'अंबानींनी अनाथांच्या जागेवर बांधलं 'अँटिलिया''


'अंबानींनी अनाथांच्या जागेवर बांधलं 'अँटिलिया''
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचं घर अर्थात 'अँटिलिया' हे अनाथांसाठी राखीव असलेल्या जागेवर बांधल्याचं महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सीईओ यांनी म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे.


जागेची पुनर्रचना करण्याची गरज

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात अँटिलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला केलेली जमिनीची विक्री बेकायदेशीर असून तिची मूळ स्थितीत पुनर्रचना करण्याची गरज असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे अंबानी यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.


गरीब, बेघर मुलांसाठी राखीव

ज्या जागी सध्या हजारो कोटी रुपयांची अँटिलिया इमारत उभी आहे ती जागा मूळची करीमभॉय इब्राहिम ख्वाजा ऑर्फनेज ट्रस्टच्या मालकीची होती. मुस्लिमांच्या ख्वाजा समाजातील गरीब आणि बेघर मुलांच्या देखभालीसाठी ही जमीन राखीव होती.


भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

२००५ साली अँटिलिया कंपनीला करण्यात आलेली जमिनीची विक्री बेकायदेशीर असल्याचा दावा करत अब्दुल मतीन यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. या जनहित याचिकेवरील मागच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार, या बोर्डाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अल्पसंख्याक विभागाचे सहसचिव संदेश तडवी यांनी गेल्या आठवड्यात बोर्डातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. याप्रकरणी उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी जानेवारी-२०१८ मध्ये होण्याची शक्यता आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा