Advertisement

राज्यापाठोपाठ केंद्राकडूनही तीराच्या औषधावरील सर्व कर माफ

तीरा कामत या ५ महिन्याच्या चिमुकलीसाठी औषध आयात करण्यास केंद्र सरकारकडून सीमा शुल्क माफ करण्यात आले आहे.

राज्यापाठोपाठ केंद्राकडूनही तीराच्या औषधावरील सर्व कर माफ
SHARES

SMA या दुर्धर आजारानं ग्रासलेल्या चिमुकल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकार पाठोपाठ आता केंद्र सरकारनंही मोठा दिलासा दिला आहे. तीरा कामत या ५ महिन्याच्या चिमुकलीसाठी औषध आयात करण्यास केंद्र सरकारकडून सीमा शुल्क माफ करण्यात आले आहे.

केंद्र सरकारनं हे सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे कामत कुटुबियांना सीमा शुल्कासाठी लागणाऱ्या जवळपास साडे सहा कोटी रुपयांची कर माफी मिळणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. त्यामुळे फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

तीराच्या पालकांनी सीमा शुल्कातून सूट मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या औषधावरील सर्व कर माफ करण्यासाठी फडणवीस यांनी १ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं आणि सीमा शुल्क माफ करण्याची विनंती केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश देताच तातडीनं त्यावर कार्यवाही झाली आहे. त्यानुसार ९ फेब्रुवारीला या औषधावरील सर्व कर माफ करण्याचा आदेश वित्त विभागानं जारी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अतिशय संवेदनशीलतेनं पुढाकार घेतल्यानं निश्चितपणे तीराचे प्राण वाचतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. तसंच तीराला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

SMA आजारावर लागणारे इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी जे सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती. ती माफ व्हावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं कामत कुटुंबियांना एक सर्टिफिकेट दिलं आहे. असं असलं तरी हे औषध भारतात येण्यासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

कामत कुटुंबियांना दिलासा, औषधावरील सीमा शुल्क माफ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा