Advertisement

राज्यातील पूरग्रस्तांना MIDCकडून मदतीचा हात

यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला.

राज्यातील पूरग्रस्तांना MIDCकडून मदतीचा हात
SHARES

कोकण किनारपट्टी तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीनं जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला.

महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचं वाटप केलं जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यात येत आहे.

ज्या गावांना एमआय़डीसीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

एमआय़डीसीच्या राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयातून ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठवण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून १ हजार राशनचे पाकिटे( 25हजार किलो), २ हजार पाण्याच्या बाटल्या, ५ हजार ५०० ब्लँकेट्स, ५ हजार ५०० टॉवेल्स पाठवण्यात आले. तर औरंगाबादमधून ५०० अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली.

कोकण किनारपट्टी तसंच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे २५ हजार कुटुंबियांना एमआयडीसीच्यावतीनं मदत दिली जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केलं जाणार आहे. शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभं असल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरु करण्यात आली आहे.

पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरलं नसल्यानं आणि बाधितांचे पंचनामे सुरू असल्यानं पुढील पंधरा दिवसांत वाढीव मदतीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणावा असं यावेळी ठरलं.

सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्य, कपडे, भांडी यांच्या नुकसानीसाठी एसडीआऱएफच्या निकषाप्रमाणे तत्काळ मदत करणं सुरू आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा