Advertisement

‘इथं’ फडकतोय मुंबईतला सगळ्यात उंच झेंडा

सरकारी कार्यालये, शाळा-काॅलेज, सहकारी सोसायट्या, मंडळांमध्ये ठिकठिकाणी तिरंगा मोठ्या डौलाने फडकतोय. पण तुम्हाला हे माहीत आहे का? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सगळ्यात उंच तिरंगा नेमका कुठं फडकतो ते?

‘इथं’ फडकतोय मुंबईतला सगळ्यात उंच झेंडा
SHARES

देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येतोय. कलम ३७० रद्द झाल्यामुळे देशवासीयांच्या उत्साहात आणखीनच भर पडलीय. त्यामुळे सरकारी कार्यालये, शाळा-काॅलेज, सहकारी सोसायट्या, मंडळांमध्ये ठिकठिकाणी तिरंगा मोठ्या डौलाने फडकतोय. पण तुम्हाला हे माहीत आहे का? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सगळ्यात उंच तिरंगा नेमका कुठं फडकतो ते? चला जाणून घेऊया.

३५० फूट- हज हाऊस

मुंबईतील सगळ्यात उंच तिरंगा क्रॉफर्ड मार्केट परिसरातील १८ मजल्यांच्या ‘हज हाऊस’ इमारतीच्या शिखरावर फडकतोय. हज हाऊसमधून महाराष्ट्रातील मुस्लिम हज यात्रेकरू रवाना होत असतात. आॅक्टोबर २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं होतं. जमिनीपासून ३५० फूट उंच असणाऱ्या हज हाऊसच्या छतावर हा झेंडा फडकवण्यात आला आहे. १८ व्या मजल्यावर २० मीटर उंचीच्या पोलवर २० X ३० फूट उंचीचा तिरंगा फडकावण्यात आला आहे. समुद्र सपाटीपासून या झेंड्याची उंची जवळपास ११६ मीटर आहे. हा राष्ट्रध्वज दर १५ दिवसांनी स्वच्छ केला जातो, तर दर महिन्याला बदलण्यात येतो. त्यासाठी वेगळ्या २२ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

१५० फूट- राजभवन

मलाबार हिल येथील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनमध्ये १५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो. १ मे २०१६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सर्वात पहिल्यांदा हा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता.

१५० फूट- बीकेसी

वांद्रे-कुर्ला संकुलातील जेएसडब्ल्यू इन कंपनीच्या मुख्यालय परिसरात १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ १५ आॅगस्ट २०१५ मध्ये उभारण्यात आला आहे. याच प्रकारचा एक राष्ट्रध्वज माझगाव डॉक इथंही डौलाने फडकतोय.

१५० फूट- मुंबई विद्यापीठ, कालिना

मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलामध्ये २०१६ मध्ये १५० उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता. या ध्वजस्तंभावर ३०x४० फूट आकाराचा राष्ट्रध्वज फडकत होता. परंतु सद्यस्थितीत देखभालीअभावी येथील राष्ट्रध्वज काढून टाकण्यात आला आहे.


१०० फूट- वांद्रे-वरळी सी लिंक

भाजपाचे तत्कालिन मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते ६७ व्या स्वातंत्र्यदिनी वांद्रे-वरळी सी लिंक इथं १०० फूट उंचीच्या तिरंग्याचं ध्वजारोहण करण्यात आलं होतं.

८२ फूट- नागपाडा जंक्शन

मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणापैकी एक असलेल्या नागपाडा जंक्शनचं नुकतंच सुशोभिकरण करण्यात आलं. स्वातंत्र्यसैनिक आणि भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या भित्तिचित्रासोबत २५ मीटर (८२ फूट) उंचीचा तिरंग्याचं या चौकात फेब्रुवारी २०१९ मध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. 



हेही वाचा-

तुमच्या दादूस या '५' ट्रेंडी राख्या

गणेशोत्सव २०१९ : 'या' दिवशी होणार तुमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा