Advertisement

गरजूंचा हेअरस्टायलिस्ट!

टिटवाळ्यातील अवलिया रविंद्र बिरारी यांनी अशांसाठी पुढाकार घेतला आहे. समाजापासून दुरावलेल्या अनेकांना आतापर्यंत रविंद्र बिरारी यांनी सामाजिक पर्वात आणलं.

SHARES

अंगावर मळकटलेले कपडे, वर्षानुवर्षे आंघोळ नाही, वाढलेली दाढी, केसांना दाट जठा असलेले असे असंख्य निराधार मुंबई आणि उपनगरात आपण पाहिले असतील. त्यांची अवस्था पाहून कुणी त्यांच्या आसपास देखील फिरकणार नाही. पण एक अवलिया मात्र या निराधारांचं दुःख समजून त्यांचं अंधारलेलं जीवन प्रकाशित करण्याच काम करत आहे.

रेल्वे स्थानकात किंवा आसपासच्या परिसरात भिकारी किंवा अनेक निराधार आपल्या वाढलेल्या दाढी आणि केसांमुळे अस्वस्थ असतात. मात्र, टिटवाळ्यातील अवलिया रविंद्र बिरारी यांनी अशांसाठी पुढाकार घेतला आहे. समाजापासून दुरावलेल्या अनेकांना आतापर्यंत रविंद्र बिरारी यांनी सामाजिक पर्वात आणलं.

आपल्या दैनंदिन केशकर्तनाच्या व्यवसायातून थोडासा वेळ काढून रेल्वे स्थानकावरील भिकारी, अपंग, अंध व्यक्तींचे केस आणि वाढलेली दाढी मोफत करून रवींद्र बिरारी यांनी समाजकार्यात नवा पायंडा पाडला आहे. गेल्या आठ वर्षांपासून रवींद्र बिरारी यांनी रेल्वे स्थानकावर असलेल्या निराधार, भिकारी आणि अपंग यांना स्वतःची ओळख मिळवून दिली आहे. पण हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं.

दर सोमवारी ते रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या परिसरात फिरतात. त्यांच्या दृष्टीस अनेक निराधार पडतात. वाढलेल्या जठा, दाढी, केस, कित्येक दिवस आंघोळ केलेली नसते, अंगावर फाटके कपडे असतात. त्यांना पाहून कुणी त्यांची विचारपूस सोडा त्यांच्या आसपास देखील फिरकत नाही. पण रविंद्र बिरारी त्यांच्या जवळ जातात. त्यांची विचारपूस करतात. त्यांना काही तरी खायला देतात.

वाढलेली दाढी, जठा कापणं गरजेचं असल्याचं त्यांना पटवून देतात. पण अनेकदा त्यांना नकार मिळाला आहे. अशा परिस्थिती हळूहळू रविंद्र त्यांचा विश्वास प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांच्यावर मार देखील खाण्याची वेळ आली आहे. पण रविंद्र यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं.

आतापर्यंत रविंद्र यांनी अनेक भिकारी, मनोरुग्ण, दिव्यांगांचे केस, दाढी कापलेले आहेत. त्यांना चांगले कपडे दिले आहेत. हे कार्य करताना त्यांना अनेक विचित्र अनुभव देखील आले आहेत.

मी गेली ८ वर्षहे काम करत आहे. हे करताना मला अनेक समस्या आल्यात. पण मी कधी मागे हटलो नाही. अनेकदा असं झालं आहे की, दाढी आणि केस कापल्यानंतर एखाद्याची स्मृती पुन्हा आली आहे. त्यांना स्वत:ची ओळख पटली आहे. अनेकांना आपला पूर्वीचा चेहरा कसा दिसायचा याचा देखील विसर पडलेला असतो. पण दाढी, केस आणि घालायला कपडे दिल्यानंतर त्यांना ते दिवस आठवतात.

रविंद्र बिरारी, सोशल बार्बर

रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिकाऱ्यांची अवस्था कित्येकदा वाईट असते. त्यांच्या शरीरावर जखमा असतात. त्यात किडे देखील पडलेले असतात. पण रविंद्र त्यांच्याजवळ जाऊन त्यांची दाढी, केस कापतात. त्यांचा जखमा साफ करतात. यामुळे ते अनेकदा स्वत: देखील आजारी पडले आहेत.

रविंद्र हे स्वत: चालत फिरतं सलून उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून ते अशा आणखीन लोकांपर्यंत पोहचून त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू शकतील. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. चला तर रविंद्र बिरारी यांना मदत करून अनेक निराधारांचा आधार बनूया.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement