छत्रपती शिवाजी महाराजांची मुंबईसह राज्यभरात १९ फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर २१ मार्च सोमवारी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यभरात सर्वत्र शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला जात आहे. विशेष म्हणजे आजच्या तिथीनुसार शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)कडून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे.
‘संपुर्ण राज्यभरात २१ मार्च रोजी धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करा’, असे आदेश मनसे अध्य राज ठाकरे यांनी पुण्यात १६ व्या वर्धापनदिनानिमित्त घेतलेल्या सभेत म्हटलं होतं. त्यानुसार, आज सर्वत्र शिवजयंती साजरी केली जात आहे. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त जय्यत तयारी याठिकाणी करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यावेळी छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेनं जय्यत तयारी केली आहे. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करत आहे. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
अशी होणार शिवजयंती साजरी
महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे अभिषेक आणि पूजन करणार आहेत. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परिसरात होणार आहे.
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी पक्षाचे नेते अभिजित पानसे आणि सचिव सचिन मोरे हे करतील अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अमेय खोपकर यांनी दिली आहे या सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त, मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील असा विश्वास अमेय खोपकर यांनी व्यक्त केला आहे.