Advertisement

Covid-19 ने मृत्यू झाल्यास ५ वर्ष कुटुंबीयांना मिळणार पगार, रिलायन्सची मोठी घोषणा

रिलायन्सनं (Reliance Industries) आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

Covid-19 ने मृत्यू झाल्यास ५ वर्ष कुटुंबीयांना मिळणार पगार, रिलायन्सची मोठी घोषणा
SHARES

रिलायन्सनं (Reliance Industries) आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कर्मचाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना पुढची ५ वर्षं त्या कर्मचाऱ्याचा शेवटच्या पगाराएवढी रक्कम मिळत राहील. तसंच त्या कर्मचाऱ्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च रिलायन्स उचलणार आहे.

एवढंच नाही तर कुटुंबीयांचा म्हणजे जोडीदार आणि मुलं तसंच पालकांच्या हॉस्पिटलायझेशन पॉलिसीचा प्रीमिअम रिलायन्सच्या वतीनं भरण्यात येईल. मुलांचं पदवीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत हा लाभ मिळेल, असं रिलायन्सच्या वतीने मुकेश आणि नीता अंबानी (Mukesh Ambani) यांनी जाहीर केलं आहे.

ऑफ रोल कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) वतीनं आणखी मोठी घोषणा करण्यात आली आहे. थेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे कर्मचारी नसलेल्या ऑफ रोल कर्मचाऱ्यांपैकी कुणाचा कोरोनानं मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या आप्तांना (Nominee)१० लाखांची मदत देण्यात येणार आहे. ही मदत रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल, असं RF च्या प्रमुख नीता अंबानी यांनी सांगितलं.

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचा कुटुंबियांचं मोफत लसीकरण करणार आहे. रिलायन्सने याबाबत घोषणा केली आहे. रिलायन्सचे ८८० शहरात असलेले १३ लाखांहून अधिक कर्मचारी, सहयोगी, पार्टनर्स आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आई-वडील, आजी-आजोबा, सासू-सासरे, मुलं, भावंडं आदींचा यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय रिलायन्समधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही लस देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरणासाठी को-विन प्लॅटफॉर्मवर (Co-WIN Platform) नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ते जिओ हेल्थक्लब (Jio Healthclub) या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना सोयीच्या असलेल्या ठिकाणी लसीकरणाचा स्लॉट बुक करू शकतात.

सरकारनं वर्कप्लेस व्हॅक्सिनेशन पॉलिसी जाहीर केली आहे. त्या अंतर्गत रिलायन्स हा उपक्रम राबवणार आहे. जामनगर, बडोदा, हझिरा, दहेज, पाताळगंगा, नागोठणे, कनिकाडा, गडिमोगा, साहडोल, बाराबंकी, होशियारपूर इथं असलेल्या रिलायन्सच्या ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर्समध्ये लसीकरण केलं जाणार आहे.

त्याशिवाय ८०० हून अधिक शहरांमध्ये असलेली रिलायन्सची हॉस्पिटल्स, तसंच अपोलो, मॅक्स, मणिपाल अशा पार्टनर हॉस्पिटल्समध्येही हे लसीकरण केलं जाणार आहे.

जे कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी आधीच लस घेतली असेल. त्यांना त्यासाठी आलेल्या खर्चाचा परतावा दिला जाणार आहे. कंपनीच्या साडेतीन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी याआधीच लशीचा पहिला डोस घेतला आहे.



हेही वाचा

रिलायन्सकडून मुंबईत ८७५ नवे बेड्स उपलब्ध, इथल्या केंद्रामध्ये आहे रुग्णांसाठी जागा

शिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा