Advertisement

निवृत्त कर्नलसाठी ‘तो’ स्विगी डिलिव्हरी बॉय ठरला देवदुत!

स्विगीनं यासंदर्भातील माहिती इन्स्टाग्रावरून दिली आहे.

निवृत्त कर्नलसाठी ‘तो’ स्विगी डिलिव्हरी बॉय ठरला देवदुत!
SHARES

एका स्विगी बॉयच्या (Swiggy delivery Boy) मदतीमुळे एका निवृत्त कर्नलचा जीव थोडक्यात बचावला आहे. स्विगीनं यासंदर्भातील माहिती इन्स्टाग्रावरून दिली आहे.

अस्वस्थ वाटू लागलं म्हणून निवृत्त कर्नलच्या मुलानं त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कार काढली. कारमधून जात असताना मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये ते अडकले. आता रुग्णालय कसं गाठायचं, असा प्रश्न कर्नल आणि त्यांचा मुलाला पडला. मदतीसाठी मुलगा रस्त्यावरील बाईकला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण कुणीच थांबत नव्हते.

अशातच स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयनं हा सगळा प्रकार पाहिला. या स्विगी बॉयचं नाव आहे मृणाल किरदत. मृणाल हा स्विगीसाठी काम करत असून तो सांताक्रूझला राहतो. निवृत्त कर्नल मलिक यांची तब्बेत बिघडत चालली असल्याचं पाहून मृणालनं त्यांना आपल्या बाईकवर बसवलं आणि थेट लिलावती रुग्णालयात नेलं.

ट्रॅफिकमधून कशीबशी वाट काढत, हॉर्न वाजवत तर कधी मोठ्यानं ओरडून लोकांना बाजूला करत मृणालनं वायूवेगानं निवृत्त कर्नल मलिक यांना रुग्णालयात पोहोचवलं. तिथे डॉक्टरांना सांगून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं निदर्शनास आणून दिलं. मृणालच्या या कामगिरीमुळेच निवृत्त कर्नल मलिक यांचा जीव थोडक्यात बचावलाय.

काही दिवस रुग्णालयात त्यांना ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेतल्यानंतर आता निवृत्त कर्नल मलिक हे ठणठणीत बरे झाले असून त्यांनी या स्विगी बॉयचे मनापासून आभार मानले आहेत.

स्विगीनं आपल्या इन्स्टाग्रामवरून ही संपूर्ण घटना शेअर करुन असून आता सोशल मीडियात स्विगी डिलिव्हरी बॉय असलेल्या मृणालचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा