SHARE

स्मार्टफोन तर हल्ली सर्वांच्याच खिशात असतो. स्मार्टफोनमुळे सगळी कामं कशी अगदी सोप्पी झाली आहेत. कुणाला संपर्क करायचा असो, गाणी ऐकायची असो, व्हिडिओ बघायचा असो अशी सर्व कामं मोबाईलमध्य होतात. अगदी स्वत:ची किंवा कुटुंबियांची, मित्र-मैत्रिणींची वैयक्तिक माहिती मोबाइलमध्ये असते. काही जणं तर एटीएम पासवर्ड किंवा इतर महत्त्वपूर्ण माहिती देखील मोबाइलमध्ये स्टोअर असते.

समजा इतका महत्त्वपूर्ण मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर? हे वाचूनच धडकी भरली असेल. मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर त्यातील माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न असतोच. जर मोबाइलमधील डेटा दुसऱ्याच्या हातात गेला तर ते नक्कीच आपल्यासाठी चांगलं ठरणार नाही. त्यामुळे हरवलेला फोन किंवा चोरीला गेलेला फोन शोधायचा कसा? याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


१) अँड्रॉइड डिव्हाईस मॅनेजर

अँड्रॉइड फोनमध्ये एक इन बिल्ट ॲप असतं, ते म्हणजे 'अँड्रॉइड डिव्हाईस मॅनेजर' (Android Device Manager). मोबाइलच्या सेटिंगमध्ये याचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ॲपला चालू स्थितीत ठेवल्यास मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर तो परत सापडू शकतो. हे ॲप आपल्या गुगल अकाउंटसोबत सिंक्रोनाईज केलेलं असतं.

तुम्ही डेस्कटॉपवरून गुगल अकाउंटचा वापर करून अँड्रॉइड डिव्हाईस मॅनेजरमध्ये लॉग इन करू शकता. आपला मोबाइल नेमक्या कुठल्या ठिकाणी आहे ते नकाशात दिसायला लागते. मग तुम्ही डेस्कटॉप वरूनच त्याला लॉक करू शकता किंवा त्यातला पूर्ण डेटा डिलीट करू शकता. इतकंच नव्हे तर फोनची रिंगसुद्धा वाजवू शकता जेणेकरून फोन जवळपास कुठेतरी असेल तर त्याची नक्की जागा शोधता येते. दुसऱ्या मोबाइलमधून देखील तुम्ही हे करू शकता. फक्त यासाठी तुम्हाला गेस्ट मोड किंवा इनकॉग्निटो मोड वापरुन लॉग इन करावं लागेल. पण जर चोरानं फोन ऑफ केला किंवा नेट बंद केलं नाहीतर फोन रिसेट केला असेल तर याचा काही उपयोग नाही. त्यामुळे फोन लॉक करून ठेवण्याची सवय असायला हवी. फोन लॉक स्थितीमध्ये कुणाला सापडला तर त्याच्या सेटिंग सहज वापरता येत नाहीत.


२) गुगल मॅप लोकेशन

'गुगल मॅप लोकेशन हिस्टरी'च्या मदतीनं तुम्ही तुमचा मोबाइल शोधू शकता. पण यासाठी तुमच्या फोनमधील लोकेशन रिपोर्टिंग आणि लोकेशन हिस्ट्री हे ऑप्शन ऑन पाहिजेत. फोन हरवला तर डेस्कटॉप वरून गुगल मॅप लोकेशन हिस्टरी तपासलंत, की तुमच्या फोनचे सध्याचं लोकेशन दिसतं. समजा फोन बंद केला गेला असेल किंवा नेट ऑफ असेल तर त्याचं शेवटचं ठिकाण कोणतं होतं याचा अंदाज येऊ शकतो. या लोकेशन हिस्ट्रीमार्फत फोन कुठल्या क्षेत्रात फिरत आहे याचा शोध घेतल्यास चोराचा शोध लागणे सहज शक्य होतं.


३) आयमीआय नंबर

तुमच्या फोनच्या डायल पॅड वर *#06# टाईप करुन कॉल बटन दाबायचं. यामुळे तुमच्या फोनचा १६ अंकी IMEI क्रमांक तुम्हाला मिळेल. तसा हा नंबर सेटिंगमध्ये किंवा मोबाइलच्या बॅटरीवर किंवा बॉक्सवरसुद्धा असतोच. फोन चोरीला गेल्यास तुम्ही सरळ हा क्रमांक पोलिसांना किंवा सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनीला द्यायचा. यामुळं फोन लवकर सापडायला मदत होईल. याशिवाय प्ले स्टोअरवर IMEI द्वारे फोन ट्रॅक करणारे अनेक अॅप्ससुद्धा उपलब्ध आहेत.
संबंधित विषय
ताज्या बातम्या