इंद्रधनूचे सात रंग अगदी लहानपणापासून अगदी आपल्याला मोहून टाकत आले आहेत. इंद्रधनुष्य दिसणं म्हणजे तो दिवस सोनियाचा असं मला नेहमीच वाटत आलं आहे. पण पूर्ण इंद्रवज्र दिसण्याचा तो दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस ठरला. लहानपणी या सात रंगांनी आयुष्य खूप समृद्ध केलं असलं, तरी त्यांच्याबद्दल वाटणारं आकर्षण तेवढंच राहील. कसे काय सात रंग? आणि ते फक्त पावसातच उन्हासोबत का दिसतात? हा कोवळ्या मनातील प्रश्न अनेक उपप्रश्नांना जागृत करून जायचा. प्रकाश जसजसा समजत गेला, तसतसं त्याचं विश्व समोर येत गेलं आणि ते जाणून घेतल्यावर या सात रंगांशी एकदम गट्टीच जमली!
सर आयझॅक न्यूटन यांने आपल्या बालपणी पडलेल्या याच प्रश्नाचं उत्तर शोधलं, ते म्हणजे प्रकाश हा सात रंगांचा बनलेला असतो. काचेच्या प्रिझममधून गेलेला प्रकाश बाहेर येताना सात रंगांची उधळण करत येतो. या सात रंगांना न्यूटनने नाव दिलं ‘स्पेक्ट्रम’. पण न्यूटन एका महत्त्वाच्या शोधापासून थोडक्यात हुकला. सूर्याचा प्रकाश सात रंगांचा बनला असेल, तर हे सात रंग आपल्यासोबत उष्णताही घेऊन येतात. कारण उन्हात उभं राहिलं, तर आपल्याला चटका बसतोच. मग हे सातही रंग सारखीच ऊर्जा आणत असतील का? हाच तो प्रश्न न्यूटन सोडवण्यापासून अडखळला.
सर विल्यम हर्षल यांना मात्र तो प्रश्न पडला आणि त्यांनी त्याचं उत्तर शोधलं. त्यांनी या सात रंगांच्या स्पेक्ट्रममध्ये वेगवेगळ्या रंगांत थर्मामिटर ठेवलं आणि जे समोर आलं तो एक शोध होता. लाल रंगाच्या खालच्या पट्टीत त्यांना सर्वाधिक तापमान दिसून आल. या न दिसणाऱ्या प्रकाशाला त्यांनी नाव दिलं 'इन्फ्रारेड'. या इन्फ्रारेडचं अस्तित्व आता आपल्याला अगदी किचनपासून ते ऑफिसपर्यंत सगळीकडे दिसून येतं.
या सात रंगांमधली गंमत इकडेच संपत नाही. प्रकाश हवेतून किंवा पोकळीतून जाताना त्याचे सातही रंग जे आपल्याला दिसतात ते एकाच वेगात प्रवास करतात. पण तो जेव्हा पाण्यावर पडतो किंवा काचेतून प्रवास करतो, तेव्हा ते बांधलेलं गाठोडं तो आपल्या समोर उघडं करतो. जेव्हा प्रिझमवर प्रकाश तिरपा पडतो, तेव्हा तो संथ होतो आणि आपले रंग मोकळे करतो. जेव्हा हे रंग प्रिझममधून बाहेर पडतात, तेव्हा ते ता.ना.पि.हि.नि.पा.जा. (तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा) घेऊन बाहेर येतात आणि आपल्यासोबत एक वेगळ विश्वही!
जोसेफ फ्रोनहॉफर यांनी जेव्हा या सात रंगांना टेलिस्कोपमधून बघितलं, तेव्हा दोन विज्ञान शाखांचं लग्न त्यांनी लावलं. नवीन जन्माला आलेल्या त्या शाखेचं नाव होतं, ‘अॅस्ट्रोफिजिक्स’. या सात रंगांमध्ये त्यांना काही काळ्या उभ्या रेषा दिसल्या. विश्वाचा सिक्रेट कोड या काळ्या रेषांमधून आपल्यापर्यंत येत होता. त्या काळ्या रेषांचं कोडं उलगडायला पुढची १०० वर्ष संशोधनात गेली. त्याने विश्वाकडे बघण्याची आपली नजर करोडो वर्ष मागे आणि करोडो किलोमीटर पलीकडे नेली! त्या काळ्या रेषा म्हणजे त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉननी कक्षा बदलताना केलेला नाच!
प्रत्येक मूलद्रव्याचा इलेक्ट्रॉन आपली कक्षा बदलताना ऊर्जा आत्मसात करतो किंवा ऊर्जा उत्सर्जित करतो. जेव्हा इलेक्ट्रॉन आतल्या कक्षेत जातो, तेव्हा जो प्रकाश बाहेर पडतो, तो सगळीकडे बाजूच्या रंगांत पसरतो. त्यातला बराचसा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही. स्पेक्ट्रममधल्या त्या काळ्या रेषा म्हणजेच त्या मूलद्रव्याचं अस्तित्व. प्रत्येक मूलद्रव्याचा स्वतःचा असा एक स्पेक्ट्रम असतो. जेव्हा रात्रीच्या अंधारात आपण स्पेक्ट्रोस्कोप घेऊन बघू, तेव्हा कोणत्याही ताऱ्याकडून येणारा प्रकाश त्याच्यावर असलेल्या मूलद्रव्यांचं अस्तित्व त्या काळ्या रेषांमधून घेऊन येत असतो. म्हणजेच आपण त्या काळ्या रेषांच्या पद्धतीला वर्गीकृत करून त्या ताऱ्यावर कोणती मूलद्रव्य असतील हे इकडे करोडो किलोमीटरवर बसूनही सांगू शकतो.
पावसात आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याकडे बघताना त्यात दिसणाऱ्या ता.ना.पि.हि.नि.पा.जा (तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा) रंगांना बघून इवल्याशा न्यूटनच्या मनात आलेल्या प्रश्नाने आपल्याला प्रकाशाने झाकलेली मूठ उघडी झाली, तर जोसेफ फ्रोनहॉफर यांच्या ‘स्पेक्ट्रल लाईन्स’नी पूर्ण विश्वाला आपल्या जवळ आणलं. एक निसर्गाचा चमत्कार किंवा हवं तर प्रकाशाचा खेळ म्हणा, पण त्याने एका विज्ञानाला जन्म दिला, ज्याच्यावर आजही संशोधन सुरु आहे.
अजूनही आपण प्रकाशाला पूर्ण ओळखू शकलेलो नाहीत. अजूनही त्याच्यातील सिक्रेट कोड डिकोड करणं बाकी आहे. पण आपल्या बालमनातील प्रश्नांना उत्तर शोधणं कधी कधी जगाचं भविष्य घडवू शकतं. म्हणून विज्ञानात पडलेला कोणताही प्रश्न हा कमीपणाचा नसतो. आपल्या मुलांच्या निरागस मनात येणारे हे असेच प्रश्न कदाचित उद्याचा न्यूटन किंवा जोसेफ फ्रोनहॉफर घडवू शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी त्या ता.ना.पि.हि.नि.पा.जा रंगांना बघू, तेव्हा प्रकाशाच्या या शक्तीला कुर्निसात करायला विसरू नका. या रंगांच्या उधळणीमध्ये करोडो वर्षांचा इतिहास आणि करोडो अंतरावरून येणारी माहिती दडलेली असते, हे आपल्या बालमनांना सांगण्यास कधीच विसरू नका!
Disclaimer: The views and opinions expressed in this article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of Mumbai Live.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)