Advertisement

आता बेस्टमध्ये पुन्हा वाजणार टीक् टीक्!

आजच्या आधुनिक युगात जग पुढे जात आहे, मात्र बेस्टने इलेक्ट्रॉनिक तिकीटावरून पुन्हा छपाई केलेल्या तिकीटांचा वापर करत एक पाऊल मागे टाकले आहे! परंतु, हे सर्व विद्यमान महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या हट्टाखातर होत असल्याचा आरोप होत आहे.

आता बेस्टमध्ये पुन्हा वाजणार टीक् टीक्!
SHARES

मुंबईत मागील काही महिन्यांपासून ट्रायमॅक्स मशीनच्या आधारे बेस्ट तिकीट देण्यावरून वाद उठलेला होता. मात्र आता या कंपनीला हद्दपार करत बेस्ट उपक्रमाने पुन्हा एकदा जुन्याच पद्धतीने तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या आधुनिक युगात जग पुढे जात आहे, मात्र बेस्टने इलेक्ट्रॉनिक तिकीटावरून पुन्हा छपाई केलेल्या तिकीटांचा वापर करत एक पाऊल मागे टाकले आहे! परंतु, हे सर्व विद्यमान महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या हट्टाखातर होत असून आपल्या मर्जीतील कंपनीला काम न मिळाल्याने ही पद्धतीच बंद करत पुन्हा एकदा बस वाहकांना टिक टिक करत तिकीट फाडायला लावले जाणार असल्याचे बोलले जात आहे.


नवी निविदा प्रक्रिया अर्धवटच सोडली!

बेस्ट उपक्रमाने सन २०११मध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक पद्धतीने छपाई केलेले तिकीट देण्यासाठी ट्रायमॅक्स कंपनीला कंत्राट दिले होते. हे कंत्राट संपल्यानंतर नवीन कंत्राट देण्यासाठी बेस्टने निविदा मागवल्या. त्यावेळी ट्रायमॅक्स कंपनीने आताच्याच मशिनमध्ये सुधारणा करून त्या देण्याची तयारी दर्शवली. यामध्ये ई-तिकीट आणि जीआयएस या प्रणालीचा समावेश होता. परंतु, ही निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी आपल्या अधिकारात पुन्हा जुन्याच तिकीटांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचे हे कंत्राट छपाईसाठी दिले आहे.


हे तर एक पाऊल मागे!

विरोधी पक्षनेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी महाव्यवस्थापकांच्या या भूमिकेचा तीव्र विरोध केला आहे. पुन्हा तिकीट छपाई करून प्रवाशांना ती उपलब्ध करून देणे म्हणजे बेस्टचे एक पाऊल मागे असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाव्यवस्थापकांना आपल्या विश्वासातील एका कंपनीला हे काम द्यायचे होते. परंतु ते देता येत नसल्यामुळे त्यांनी हे काम कुणालाच द्यायचे नाही, असा निर्णय घेत एक प्रकारे मनमानी कारभार केला आहे. बेस्ट आर्थिक तोट्यात असताना, तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. परंतु, ई-तिकिटाच्या तुलनेत छपाई केलेल्या तिकीटांवर अधिक खर्च होणार आहे. त्यामुळे उपक्रमावर आर्थिक भार वाढेल.

रवी राजा, सदस्य, बेस्ट समिती


Read this story in हिंदी
संबंधित विषय