बेस्ट उपक्रमातील वातानुकूलित बस भंगारात काढल्यानंतर बेस्ट आता भाडेतत्वावर एसी मिनी बसची सेवा घेणार आहे. मुंबईसाठी एसी मिनी बस भाडेतत्वावर घेतानाच बेस्ट १२५ साध्या मिनी आणि मिडी बसही भाडेतत्वावर घेणार आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
बेस्ट उपक्रमाने खरेदी केलेल्या किंगलाँग एसी बस भंगारात निघाल्यानंतर सध्या बेस्टकडे एकही एसी बस नाही. त्यातच आर्थिक तोट्यात चाललेल्या बेस्टला नफ्यात आणण्यासाठी खासगी भाड्यावरील बसची सेवा घेण्याची शिफारस मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली आहे. या अनुषंगाने बेस्ट उपक्रमाने एकूण २२५ एसी तसेच साध्या बसची सेवा भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्ट उपक्रमाने यासाठी तिसऱ्यांदा निविदा मागवून याची संबंधित प्रक्रीया पूर्ण केली आहे. त्यानुसार १०० मिनी एसी बसगाड्या, १०० मिनी बिगर एसी बसगाड्या आणि २५ मिडी बिगर एसी बसगाड्या भाडयाने घेण्यासाठी कंपनींची निवड केली आहे.
एसी आणि साध्या मिनी बससाठी प्रत्येक महिन्याला ३५०० कि.मीटर्स एवढं अंतर, तर २५ मिडी बससाठी प्रत्येक महिना ४००० कि. मीटर्स एवढं किमान अंतर अपेक्षित आहे. त्यासाठी वर्षाला ३.५० ते ४.५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
हेही वाचा-
बीकेसीत वर्तुळाकार जलद बेस्ट मार्ग सुरू
१० हायब्रिड बस आगारात धुळखात पडून