Advertisement

जाणून घ्या, कशी असेल बुलेटराणी ?


जाणून घ्या, कशी असेल बुलेटराणी ?
SHARES

बुलेट ट्रेन... ज्या सुसाट वेगात मुंबई ते अहमदाबाद अशी धावणार आहे, त्याच वेगात देशभर चर्चा आहे ती मोदी-शिंजो आबेंच्या बुलेट मैत्रीची. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ जरी गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरूवारी पार पडला असला, तरी मुंबईकरांमध्येही या बुलेट ट्रेनबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

मुंबईत बुलेट ट्रेनची ४ स्थानके असताना महाराष्ट्राने एकूण प्रकल्प खर्चाच्या ५ टक्के रक्कम या प्रकल्पासाठी का खर्च करायची ? ते देखील तिजोरीत खडखडाट असताना, बुलेट ट्रेनची गरजच काय? अशा एक ना अनेक कारणांनी बुलेट ट्रेनवर टीकाही होत आहे. तरीही देशात पहिल्यांदाच वेगळ्या तंत्रज्ञानावर धावणारी बुलेट ट्रेन नेमकी कशी असेल, याबाबत मुंबईकरांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी घेतलेला हा आढावा.



मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट
  • चीन, जपानसह सध्या १५ देशांमध्ये बुलेट ट्रेन धावते
  • देशात पहिल्यांदा मुंबई ते अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन भविष्यात धावेल


खर्च 

१ लाख १० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून यासाठी जपान सरकार कर्ज देणार आहे. सुमारे ८८ हजार कोटींचे कर्ज ५० वर्षांसाठी जपानकडून मिळणार असून त्यासाठी जपान १ टक्के व्याज आकारणार आहे. कर्ज मिळाल्यानंतर १५ वर्षांनंतर कर्ज फेडण्याची प्रक्रिया सुरू होईल. केवळ व्याजाच्या रुपाने ७ ते ८ कोटी महिन्याला मोजावे लागतील. खर्चाचा उर्वरित निधी गुजरात आणि महाराष्ट्राला उभारावा लागणार आहे.


कोण राबवणार प्रकल्प?

गुजरात आणि महाराष्ट्रातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असला तरी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी 'हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन'वर टाकण्यात आली आहे. जपानचे अभियंते यासाठी त्यांना आवश्यक ती मदत करणार आहेत. हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्ण करण्याचा मानस आहे.



अंतर, वेग, स्थानक

  • ५०८ किमी अंतर
  • ४६८ किमी उन्नत मार्ग
  • २७ किमी जमिनीवरून धावणार
  • १३ किमी भुयारी मार्ग
  • १५६ किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, तर ३५१ किमीचा मार्ग गुजरातमधून 
  • वेग ताशी ३२० ते ३५० किमी
  • ५०८ किमीच्या मार्गावर १२ स्थानके
  • वांद्रे, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सूरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती
  • ७ ते ८ तासाचे अंतर बुलेट ट्रेनने केवळ २ ते ३ तासात पार
  • ट्रेन ८ स्थानकांवर थांबली, तर २ तास ५८ मिनिटांत अंतर कापणार
  • ट्रेन ४ स्थानकांवर थांबली, तर २ तास ७ मिनिटांत अंतर कापणार


प्रवासी क्षमता

जपानमधील शिंकासेन ई-५ या बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशाच्या बुलेट ट्रेनची बांधणी असणार आहे. सुरूवातीला १० डब्ब्यांची बुलेट ट्रेन धावेल. त्यानंतर भविष्यात ही ट्रेन १६ डब्यांची होणार आहे. १० डब्ब्यांच्या ट्रेनमधून ७५० प्रवासी, तर १६ डब्याच्या ट्रेनमधून १२५० प्रवासी प्रवास करू शकतील. आधी २४ बुलेट ट्रेन या मार्गावरून धावणार असून या ट्रेनच्या ७० फेऱ्या होणार आहेत. तर २०५३ मध्ये ३५ बुलेट ट्रेन तर त्यानंतर १०५ ट्रेन सुरू करण्याचे नियोजन आहे.


सुमद्राखालून बुलेट ट्रेन

या बुलेट ट्रेनच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे ही बुलेट ट्रेन चक्क समुद्राखालून धावणार आहे. २१ किमी पल्ला बुलेट ट्रेन भुयारी मार्गातून पार करणार असून यातील ७ किमीचा पल्ला समुद्राखालून असणार आहे.


तिकीट

बुलेट ट्रेनमध्ये कधी बसायला मिळेल याचा विचार आतापासूनच अनेक मुंबईकरांच्या डोक्यात आणि मनात सुरू झाला असेल. तेव्हा २०२२ मध्ये बुलेट ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्यांना यासाठी ३ हजार ते ५ हजार रुपये इतके तिकीट मोजावे लागणार आहे. विमानाच्या तुलनेत हा प्रवास स्वस्त असल्याचा दावा केला जात आहे.



बुलेट ट्रेनमधील अन्य सोयी

  • प्रशस्त अशा या ट्रेनमध्ये प्रसाधन गृह, खानपान सेवा
  • अपंगांसाठी प्रशस्त असे स्वतंत्र प्रसाधन गृह
  • स्तनपानासाठी स्वतंत्र डबा
  • आजारी प्रवाशांसाठी स्वतंत्र विभाग
  • लहान मुलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह


२० हजार जणांना रोजगार

या प्रकल्पांमुळे मोठ्या संख्येने गुजरातसह मुंबईत रोजगार निर्माण होईल, असा दावा केंद्राकडून केला जात आहे. सुमारे २० हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगतानाच परकीय गुंतवणूक वाढेल, असाही दावा केंद्राचा आहे.



हे देखील वाचा -

एसी लोकलमध्ये मालडबा, अपंग डब्यांची संख्या कमी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा