मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याशिवाय, मृत्यूची संख्याही वाढत चालली असून, बुधावारी आणखी एका बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागातील एका ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मुंबईतील शताब्दी रुग्णालयात या कर्मचाऱ्यावर उपचार सुरू होते.
बेस्टच्या वाहतूक विभागात ते कार्यरत होते. घाटकोपर इथं राहणाऱ्या या कर्मचाऱ्याला ५ मे रोजी ताप आला होता. त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे ते उपचार घेत होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळं ९ मे रोजी ते स्वतःहून नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. १२ मे रोजी त्यांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आला. त्यात ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं.
नवी मुंबईतील कोणत्याही रुग्णालयात खाटा उपलब्ध झाल्या नसल्यानं त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर तातडीनं त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
बेस्टमधील ९५ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. बुधवारी आणखी १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली. ९५ पैकी आतापर्यंत पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ५७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३५ टक्के आहे. आतापर्यंत ३३ कर्मचारी बरे झाले आहेत. बुधवारी ८ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले.
हेही वाचा -
यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी
धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या १००० पार