पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक, तर मध्य रेल्वे घेणार ६ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक


  • पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक, तर मध्य रेल्वे घेणार ६ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक
SHARE

येत्या रविवारी म्हणजेच ४ फेब्रुवारीला रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक तर मध्य रेल्वेवर ६ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक असेल.

एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर उपनगरीय रेल्वे मार्गावरील तीन पादचारी पुल उभारण्याची जबाबदारी लष्करावर सोपवण्यात आली आहे. करीरोडच्या पादचारी पुलासाठी मध्य रेल्वेवर रविवारी ४ फेब्रुवारीला सकाळी ८.३० पासून सीएसएमटी ते दादरपर्यंत लोकल सेवा जवळपास आठ तासांपर्यंत बंद राहणार आहेत.

तर, पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते अंधेरी दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत तर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पाचव्या मार्गिकेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान, जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा धिम्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.


मध्य रेल्वेवरील विशेष ब्लॉक

मध्य रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड-परळ आणि करीरोड पादचारी पूल तयार करताना त्यासाठी सांगाडा आणि त्यावर गर्डर उभारले जातात. ही प्रक्रिया करताना विद्युतपुरवठा खंडीत करण्याची खबरदारी घेतली जाते. त्यामुळे दादर ते सीएसएमटीपर्यंतचा विद्युत पुरवठा तात्पुरता बंद केला जाणार आहे.ब्लॉकदरम्यान 'ही' सेवा बंद असणार

ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गांवर स. ८.३० ते दु. ४.३० पर्यंत आणि डाउन जलद, अप जलद आणि डाउन धीम्या मार्गावरील स. ९.३० ते दु. ३.३० पर्यंत सेवा बंद राहतील. या कालावधीत काही मेल-एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.


सकाळी 'या' शेवटच्या ट्रेन्स

दादर स्थानकावरून सकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ८.१२ वाजता जलद मार्गावरून धावेल. तर, शेवटची धीमी लोकल दादरहून सकाळी ९.०० वाजता सीएसएमटीच्या दिशेने सुटेल. तर,सीएसएमटीहून सकाळची शेवटची धीम्या मार्गावरील लोकल ९.०५ वाजता सुटेल.

सीएसएमटीहून शेवटची जलद लोकल सकाळी ९.१२ वाजता सुटेल. ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर पहिली लोकल ३.३५ मिनिटांनी सुटेल. म्हणजेच रविवारी सकाळी ८ नंतर तब्बल ६ ते ८ तास एकही ट्रेन उपलब्ध होणार नाही.

तसंच मेल-एक्स्प्रेसमध्ये शनिवारी सह्याद्री एक्स्प्रेस आणि सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. तर रविवारी सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस आणि सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या