Advertisement

एसटी संपाचा चौथा दिवस; उद्धव ठाकरेंची मध्यस्थी? तोडगा निघणार?


एसटी संपाचा चौथा दिवस; उद्धव ठाकरेंची मध्यस्थी? तोडगा निघणार?
SHARES

वेतनवाढीच्या मागणीवरून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. संप मिटवण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह एसटी महामंडळाकडून अनेक जोर बैठका काढण्यात आल्या, चर्चेची गुऱ्हाळं गाळण्यात आली. पण कर्मचारी मात्र वेतनवाढीवर ठाम असल्याने संप मिटण्याएवजी चिघळतच चालला आहे. तर, दुसरीकडे एेन दिवाळीत प्रवाशांचे, विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आता हा संप मिटवण्यासाठी, संपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावते यांच्याशी चर्चा केल्याचे समजत आहे. या चर्चेनुसार शनिवारी भाऊबीज असल्याने कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी संप मिटवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याने कोणत्याही क्षणी आता हा संप मिटेल अशीही चर्चा आहे.

याविषयी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केल्याचे आम्ही ही प्रसारमाध्यमांमधूनच एेकत आहोत, पण प्रत्यक्ष आमच्याशी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही चर्चा अद्याप केलेली नाही वा आम्हाला चर्चेसाठी अद्याप कोणतेही निमंत्रण आलेले नाही' असे सांगितले. तर 'प्रवाशांचे हाल होत आहेत याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. शनिवारी भाऊबीज आहे. त्यामुळे संप लवकर मिटावा, अशी आमचीही इच्छा असून त्यासाठी चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नही करत आहोत. लवकरच काही तरी तोडगा निघेल', अशी आशाही शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

'उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याची माहिती प्रसारमाध्यमातूनच आपल्यासमोर येत आहे. एसटी महामंडळाशी अशी कोणतीही चर्चा  झाली नसल्याचे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले आहे. त्यामुळे जोपर्यंत एसटी महामंडळ, कर्मचारी संघटना आणि मुख्यमंत्री वा उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होत नाही, तोपर्यंत तोडगा निघणार नसल्याचे बोलले जात आहे.



हेही वाचा

'एक उपाशी, तर दुसरा खातो तुपाशी', एसटी संपाचा फायदा घेत खासगी वाहनांची दरवाढ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा