Advertisement

हायब्रीड बस कुणाच्या फायद्याची? थेट मार्ग, क्षमताही कमी

२५ हायब्रीड बसच्या खरेदीवर एमएमआरडीएनं तब्बल ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. एक हायब्रीड बस २ कोटी रुपयांची आहे. ठराविक मार्ग, मार्गात इतर थांबे नसणं, कमी प्रवाशी क्षमता आणि भरमसाठ तिकीट दर यामुळे या सेवेला कितपत आणि कसा प्रतिसाद मिळतो? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हायब्रीड बस कुणाच्या फायद्याची? थेट मार्ग, क्षमताही कमी
SHARES

आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलाला स्मार्ट सिटी बनवण्याचं उद्दीष्ट्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए) ने समोर ठेवलं आहे. त्याचाच भाग म्हणून बीकेसीतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी 'एमएमआरडीए'ने इलेक्ट्रीक अर्थात हायब्रीड बस प्रकल्प हाती घेतला खरा; पण या हायब्रीड बसचा किती प्रवाशांना फायदा होईल, हाच खरा प्रश्न आहे.


थेट प्रवास करणाऱ्यांनाच फायदा

कारण ,केवळ ४ मार्गांवरच या हायब्रीड बस धावणार असून यापैकी तीन मार्ग थेट असणार आहेत. म्हणजेच सुरूवातीचं आणि शेवटचं स्थानक यामध्ये एकही थांबा नसेल. म्हणजेच ज्या प्रवाशांना खारघर ते बीकेसी, ठाणे ते बीकेसी आणि बोरीवली ते बीकेसी असा थेट प्रवास करायचा असेल त्यांनाच या हायब्रीड बसचा फायदा होणार आहे. बोरीवलीवरून निघालेल्या प्रवाशाला गोरेगाव, अंधेरी इतकंच काय तर वांद्र्यातील कलानगरही उतरता येणार नाही.



केवळ ३० प्रवाशांसाठी

शुक्रवारी १६ मार्चला हायब्रीड बस प्रकल्पाला मुहूर्त मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता या बस प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं. मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली ही बस बॅटरीवर चालणारी असून पर्यावरणपूरक मानली जात आहे. संपूर्णत वातानुकुलित अशा हायब्रीड बसमधून आरामदायी प्रवास करण्याची संधी मुंबईकरांना यामुळे मिळणार असली, तरी किती मुंबईकरांचा यामुळे फायदा होणार हा मोठा प्रश्नच आहे. कारण हायब्रीड बसमधील आसनव्यवस्था केवळ ३० प्रवाशांसाठीच असून ही संख्या अत्यंत तुटपूंजी आहे.



मर्यादीत फेऱ्या

या प्रकल्पासाठी एकूण २५ हायब्रीड बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या हायब्रीड बसचं तिकीट २० ते ११० रुपये असणार आहे. तिकीटाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास बीकेसी ते सायन, बीकेसी ते वांद्रे आणि बीकेसी ते कुर्ला हा एकमेव वर्तुळाकार मार्ग प्रवाशांच्या फाद्याचा ठरू शकेल, असं दिसत आहे. उर्वरीत ३ थेट मार्गांसाठी प्रवाशांना ११० रुपये मोजावे लागणार आहेत. हे तिकीट नक्कीच जास्त आहे. हायब्रीड बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या बीकेसीतील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना हे तिकीट कितपत परवडेल हाच प्रश्न आहे.


दक्षिण मुंबईत बस नाहीच

पश्चिम, मध्य उपनगरं आणि नवी मुंबईसह दक्षिण मुंबईतून चाकरमानी बीकेसीत येतात. मात्र एमएमआरडीएने दक्षिण मुंबईतील प्रवाशांकडं दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. कारण ज्या मार्गांवर हायब्रीड बस धावणार आहे, त्या मार्गांमध्ये दक्षिण मुंबईचा समावेश नाही. हायब्रीड बसच्या ४ मार्गांमधून दक्षिण मुंबईला वगळण्यात आलं आहे. त्यामुळेही अनेकांमध्ये नाराजी आहे.



५० कोटींचा खर्च

मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या या २५ हायब्रीड बस पहिल्यांदाच भारतात तयार करण्यात आल्या आहेत. या २५ हायब्रीड बसच्या खरेदीवर एमएमआरडीएनं तब्बल ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. एक हायब्रीड बस २ कोटी रुपयांची आहे. ठराविक मार्ग, मार्गात इतर थांबे नसणं, कमी प्रवाशी क्षमता आणि भरमसाठ तिकीट दर यामुळे या सेवेला कितपत आणि कसा प्रतिसाद मिळतो? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.



हेही वाचा-

जानेवारीपासून बीकेसीतील चाकरमान्यांचं टाइमटेबल बदलणार

वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनचं स्थानक



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा