Advertisement

'एमएमआरडीए'ने घेतला मोनोरेलचा ताबा, स्कोमी, एल अँड टीची हाकालपट्टी

एमएमआरडीएनं स्कोमी-एल अॅण्ड टीला मोठा दणका देत कंपनीला मोनोतून बाहेर फेकून दिलं आहे. कंपनीकडून देखभाल-व्यवस्थापन काढून घेत संपूर्ण मोनोचा ताबा एमएमआरडीएनं शुक्रवारपासून घेतल्याचं कवठकर यांनी सांगितलं आहे. आता मोनो एमएमआरडीए चालवणार असून मोनोतील सर्व अधिकारी-कर्मचारी वर्ग आता 'एमएमआरडीए'कडे वर्ग होणार आहेत.

'एमएमआरडीए'ने घेतला मोनोरेलचा ताबा, स्कोमी, एल अँड टीची हाकालपट्टी
SHARES

चेंबूर ते वडाळा मोनो मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) साठी पांढरा हत्ती ठरत आहे. मोनोच्या व्यवस्थापनावर दिवसाला लाखोंचा खर्च होत असताना उत्पन्नाच्या नावाने मात्र बोंब आहे. त्यातच मोनोच्या देखभाल-व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या स्कोमी आणि एल अॅण्ड टी कंपनीकडून ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली जात नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे 'एमएमआरडीए'ने शुक्रवारी, १४ डिसेंबरला 'मोनो' पूर्णपणे ताबा घेतला आहे. मोनोरेल चालवण्यासोबतच 'एमएमआरडीए' मोनोची देखभालही करणार असल्याची माहिती सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


देखभालीकडे दुर्लक्ष

चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्गातील पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ रोजी सेवेत दाखल झाला. त्या दिवसापासून मोनोच्या व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी स्कोमी-एल अॅण्ड टी कंपनीवर टाकण्यात आली आहे. यासाठी 'एमएमआरडीए' प्रति ट्रिप ४ हजार ६०० रुपये कंपनीला मोजत होती. इतका खर्च करूनही कंपनीकडून मोनोची ना देखभाल व्यवस्थित होत होती ना व्यवस्थापन. कित्येक वेळा मोनोचे अपघात झाले, मोनो गाडीला आग लागली. त्यामुळं एमएमआरडीएचं मोठं आर्थिक नुकसान होत होतं. त्यात प्रवाशांनी मोनोकडे पाठ फिरवल्यानं दिवसाला 'एमएमआरडीए'ला ५ ते ६ लाखांचं नुकसान सहन करावं लागत होतं.


मोनो ९ महिने बंद

त्यातच गेल्या वर्षी मोनोच्या डब्याला आग लागली नि त्यानंतर मोनो सेवा तब्बल ९ महिन्यांसाठी बंद राहिली. यामुळं आर्थिक नुकसानीचा भार आणखी वाढला आहे. हे नुकसान कमी म्हणून की काय स्कोमी-एल अॅण्ड टी नं देखभाल-व्यस्थापनाचा खर्च वाढवून मागितला. एमएमआरडीएकडे पर्याय नसल्यानं एमएमआरडीएनं प्रति ट्रिप ४ हजार ६०० वरून प्रति ट्रिप १० हजार ६०० रुपये इतकी रक्कम वाढवून दिली.

मात्र, ही रक्कम वाढवून दिल्यानंतरही परिस्थिती 'जैसे थी' होती. कंपनीकडून व्यवस्थापन-देखभालीमध्ये कमालीचा हलगर्जीपणा केला जात असल्याचं निदर्शनास येत होत. तर 'एमएमआरडीए'च्या अटी शर्तीचं उल्लंघन होत होतं, 'एमएमआरडीए'च्या सूचनांची अंमलबजावणी होत नव्हती.


कर्मचारीही वर्ग होणार

या पार्श्वभूमीवर अखेर एमएमआरडीएनं स्कोमी-एल अॅण्ड टीला मोठा दणका देत कंपनीला मोनोतून बाहेर फेकून दिलं आहे. कंपनीकडून देखभाल-व्यवस्थापन काढून घेत संपूर्ण मोनोचा ताबा एमएमआरडीएनं शुक्रवारपासून घेतल्याचं कवठकर यांनी सांगितलं आहे. आता मोनो एमएमआरडीए चालवणार असून मोनोतील सर्व अधिकारी-कर्मचारी वर्ग आता 'एमएमआरडीए'कडे वर्ग होणार आहेत.

तर मोनोची जबाबदारी पूर्णपणे 'एमएमआरडीए' पेलणार असल्यानं आर्थिक भार कमी होईल, असा विश्वासही कवठकर यांनी व्यक्त केला आहे. तर मोनोमध्ये आणखी चांगल्या सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न 'एमएमआरडीए'कडून केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.हेही वाचा-

मोनोरेल 'एमएमआरडीए'साठी ठरणार पांढरा हत्ती!

चेंबूर नाक्यावर मोनोरेल पडली बंद, प्रवासी अडकले

अरेरे! मोनोचे प्रवासी ५ हजारांनी घटले!!Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा