Advertisement

वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी नव्यानं निविदा


वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी नव्यानं निविदा
SHARES

ठाणेकरांचं मेट्रोतून प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. कारण वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ च्या कामाला नव्या वर्षात सुरूवात करून पुढील अडीच ते ३ वर्षांत काम पूर्ण करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)चा मानस आहे. त्यासाठी रविवारी मेट्रो-४ च्या कामासाठी ५ पॅकेजमध्ये निविदा मागवण्यात आल्याची माहिती 'एमएमआरडीए'चे वरिष्ठ अधिकारी पी. आर. के. मूर्ती यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. निविदा अंतिम करत नव्या वर्षाच्या सुरूवातीला प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


म्हणून पुन्हा निविदा

एकूण ३२.३ किमीच्या आणि अंदाजे १४,५४९ कोटी रुपयांच्या मेट्रो-४ च्या बांधकामासाठी याआधी, जानेवारी २०१७ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. पण या निविदा प्रक्रियेत कंपन्यांनी अधिकची बोली लावल्यानं निविदा रद्दबातल करण्याची नामुष्की 'एमएमआरडीए' ओढवली. आता मात्र हा प्रकल्प शक्य तितक्या लवकरच मार्गी लावण्याच्यादृष्टीने या प्रकल्पासाठी नव्यानं, पुनर्निविदा मागवण्यात आल्या आहेत.


'असे' आहेत टप्पे

या पुनर्निविदेनुसार मेट्रो-४ चं काम ५ टप्प्यांमध्ये होणार असून वडाळा ते अमरमहल जंक्शन असा पहिला टप्पा असणार आहे. तर गरूडीयानगर ते सूर्यानगर असा दुसरा, गांधीनगर ते सोनापूर असा तिसरा, मुलुंड फायर स्टेशन ते माजीवाडा असा चौथा आणि कापूरबावडी ते कासारवडवली असा पाचवा टप्पा असणार आहे.

या पाचही टप्प्याच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. डिसेंबरपर्यंत कंत्राटदारांना निविदा सादर करायच्या आहेत. त्यानुसार निविदा अंतिम करत फेब्रुवारी-मार्च २०१८ पर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकराचं मेट्रोचं स्वप्न आता दृष्टीक्षेपात आल्याचं म्हटलं जात आहे.


मेट्रो-२ 'ब'साठीही निविदा

'एमएमआरडीए'नं मेट्रो-२ 'ब' च्या पहिल्या टप्प्यातील ११ स्थानकांच्या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. मग या निविदेलाही मेट्रो-४ प्रमाणेच अधिकची बोली लावल्यानं ही निविदाही 'एमएमआरडीए'ला रद्दबातल करावी लागली होती. त्यामुळं रविवारी एमएमआरडीएने मेट्रो-२ 'ब' च्या पहिल्या टप्प्यातील ११ स्थानकांसाठीही निविदा मागवल्या आहेत.

त्यानुसार दोन पॅकेजमध्ये अर्थात ६-६ स्थानकांसाठी या निविदा मागवण्यात आल्याचं मूर्ती यांनी स्पष्ट केलं आहे. तर या पॅकेजच्या कामालाही फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये सुरूवात होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

मेट्रो प्रवाशांनो रांग विसरा, 'असं' मिळवा मोबाईलवर तिकीट!

नाहीतर मेट्रो ३ ला ब्रेक लावू, उच्च न्यायालयाने 'एमएमआरसी'ला ठणकावलं

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरून धावणार मेट्रो ४



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा