Advertisement

टिटवाळ्यात ‘बदला’पूर टळलं


टिटवाळ्यात ‘बदला’पूर टळलं
SHARES

मुंबई – नेहमीच सहनशीलता दाखवणाऱ्या प्रवाशांचा संयम संपल्यावर उत्स्फूर्त आंदोलन होतं. टिटवाळा रेल्वे स्थानकात बुधवारी पहाटे त्याचं प्रत्यंतर आलं. पहाटे साडे पाचला मुंबईकडे जाणारी लोकल गेल्यावर गाड्यांचा गोंधळ सुरू झाला. आसनगाव स्थानकातली तांत्रिक समस्या हे त्याचं कारण. सकाळीच कार्यालयाकडे निघालेले चाकरमानी, शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना या गोंधळाची कल्पना आल्यावर त्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी कल्याणपर्यंत जाऊ देण्याची विनंती केली, पण त्यावर त्वरेनं कार्यवाही झाली नाही. दोन मेल-एक्स्प्रेस गाड्या डोळ्यांसमोरून निघून गेल्यावर प्रवासी संतप्त झाले.
स्थानकात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला लेट होतो, तर आधीची गाडी पकडा असं उत्तर दिल्यानं भडका उडाला. मग प्रवासी गुप्ता नावाच्या या कर्मचाऱ्यास कार्यालयाबाहेर बोलावून त्याच्यासह रुळांवर उतरले. आम्हीही इथे उभं राहतो, तुम्हीही उभं रहा, अशी प्रवाशांची भूमिका होती. माझ्या हातात मेल-एक्स्प्रेस गाड्या थांबवण्याचा अधिकार नाही, हे गुप्ता यांचं म्हणणं मान्य करत प्रवाशांनी मग अधिकार हाती आहेत अशा वरिष्ठाला बोलावण्याची मागणी लावून धरली.तोपर्यंत या आंदोलनाची माहिती रेल्वे मुख्यालयापर्यंतही पोहोचली आणि मग चक्रं फिरू लागली. के-3 रेल्वे प्रवासी संघटनेचे स्थानक प्रतिनिधी विवेकानंद कानिटकर आणि सहखजिनदार केतन कान्हेरे यांनी मदत सुरू केली. असा प्रकार पुन्हा घडला, तर मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देऊन आमची रखडपट्टी होणार नाही आणि बेजबाबदार उत्तरं देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाईचं लेखी आश्वासन अशी प्रवाशांनी केलेली मागणी या अधिकाऱ्यांनी मान्य केली, तसं पत्र दिलं आणि मग हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा