Advertisement

वाहतूक सुरळीत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू - शिवसेना


वाहतूक सुरळीत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू - शिवसेना
SHARES

मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीविरोधातील वाद चिघळलेला असतानाचा आता मेट्रो-3 च्या कामासाठी बेस्ट बसेसची वाहतूक वळवण्यात आल्याने या वादात आणखी भर पडणार आहे. मेट्रो-3 च्या कामासाठी दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बेस्ट बसेस गिरगाव चर्च, प्रार्थना समाजपासून महर्षी कर्वे रोडवरून वळवल्या आहेत. त्यामुळे गिरगाव, ठाकूरद्वार आणि चिराबाजारमधील रहिवाशांची-प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता शिवसेनेने याविरोधात दंड थोपटले आहेत. ही वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराच आता शिवसेनेने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ला दिल्याची माहिती शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिला आहे.


हेही वाचा

मेट्रो-3 चा वाद पुन्हा न्यायालयाच्या दारात


मेट्रो-3 चे काम दक्षिण मुंबईत जोरात सुरू आहे. या कामासाठी पोर्तुगीज चर्चपासून पुढे चर्चगेटपर्यंत अनेक ठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पोर्तुगीज चर्चवरून मंत्रालय आणि सीएसटीला जाणाऱ्या 65, 66, 69, 104, 126, 132 सह अन्य काही बेस्ट बसची वाहतूक मागील दोन दिवसांपासून वळवण्यात आली आहे. पोर्तुगीज चर्चवरून उजव्या बाजूने सरळ या बसेस चर्नीरोड, मरीन लाईन्सवरून पुढे मेट्रोकडे जात असल्याने गिरगाव, ठाकुरद्वार आणि चिराबाजारमधील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना या बसने प्रवास करण्यासाठी स. का. पाटील उद्यानाकडे यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना होणारी ही गैरसोय बेस्ट आणि एमएमआरसीने त्वरीत दूर करावी, अशी मागणी सकपाळ यांनी केली आहे.


हेही वाचा

मेट्रोमुळे झाले दुधाचे वांदे, म्हशी दूधच देईनात!


ही वाहतूक सुरळीत करावी अन्यथा शिवसेना या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देणारे फलक गिरगाव, ठाकुरद्वार आणि चिराबाजार परिसरात लावण्यात आले आहेत. तर लवकरच यासंबंधीचे निवेदन एमएमआरसीला देण्यात येणार आहे. या निवेदनानुसार येत्या काही दिवसांत वाहतूक सुरळीत केली नाही, तर एमएमआरसीविरोधात रस्त्यावर उतरू, असेही सकपाळ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ही गैरसोय एक दिवसाची नसणार आहे, पुढची कित्येक वर्ष हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे रहिवाशांनी हा त्रास सहन करायचा का? असा सवाल करत शिवसेनेने एमएमआरसीला इशारा दिला आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार आम्हाला बेस्ट बसेसची वाहतूक वळवावी लागते, त्यानुसार ही वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय