Advertisement

'जेट बंद झाल्यानं आमच्या स्वप्नांचं उड्डाण कोसळलं'

एकेकाळी आकाशाला गवसणी घालणारी जेट एअरवेज कंपनी अचानक बंद पडली. फक्त तपेशचेच नाही, तर जेट एअरवेजच्या तमाम कर्मचाऱ्यांची स्वप्न धुळीला मिळाली आहेत. जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

'जेट बंद झाल्यानं आमच्या स्वप्नांचं उड्डाण कोसळलं'
SHARES

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तपेश कुमार हा तरुण जेट एअरवेज कंपनीत दाखल झाला. तपेशच्या वडिलांनी अनेक वर्ष जेट एअरवेजसोबत उड्डानं भरली. स्वत:च्या मुलासाठी देखील त्यांनी तेच स्वप्न बघितलं. उंच आकाशात उडण्याचं वडिलांचं स्वप्न तपेशनं पूर्ण केलं. २०१३ साली त्यानं पायलट म्हणून जेट एअरवेज जॉईन केलं. पण जेट एअरवेज कंपनीसोबतची अनेक वर्षांची त्याची साथ आज सुटली आहे

एकेकाळी आकाशाला गवसणी घालणारी जेट एअरवेज कंपनी अचानक बंद पडली. फक्त तपेशचेच नाही, तर जेट एअरवेजच्या तमाम कर्मचाऱ्यांची स्वप्न धुळीला मिळाली आहेत. जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्याचा विरोध करायला कर्मचाऱ्यांनी विरोध प्रदर्शन सुरू केलं आहे. विरोध प्रदर्शन करूनही कर्मचाऱ्यांचे प्रश्न जैसे थेच आहेत

बोटावर मोजण्या इतक्याच कर्मचाऱ्यांना दुसऱ्या एअरलाईन्समध्ये नोकरी मिळाली आहे. तपेश कुमार देखील या मोजक्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. तपेश कुमारला जेट एअरवेजमध्ये ५ वर्षे झाली. भविष्यात तो एअर एशिया कंपनीसोबत काम करणार आहे. तपेश कुमार स्वत:ला यासाठी खूप नशीबवान समजतो.

तपेश कुमारनुसार, खूप कमी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या एअरवेज कंपनीत नोकरी मिळाली आहे. पण आजही कित्येक कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत आणि दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहेत. माझी आर्थिक परीस्थिती थोडी चांगली आहे आणि मी भविष्यासाठी बचत केली होतीच. शिवाय माझ्या हातात एक नोकरी असून मी लवकरच तिथं जॉईन होईन. त्यामुळे या संकटातून मी सावरू शकलो. पण इतर कर्मचाऱ्यांचं काय? कित्येक कर्मचाऱ्यांवर त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी आहे. मुलांचं शिक्षण, घराचा खर्च, औषध पाणी यासाठी पैसा तर लागणार. दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्यांच्या या समस्या कशा सुटणार? हा मोठा प्रश्नच आहे.”

जेट एअरवेजमध्ये तपेशची पहिली नोकरी होती. पण वडिल जेट एअरवेजशी जोडलेले असल्यामुळे त्याच्यासाधी हे नवीन नव्हतं. या नोकरीशी दोघांच्याही भावना जोडल्या आहेत. त्यामुळे जेट एअरवेज आता बंद पडली आहे, हे समजून घेणं दोघांना जड जात होतं.

कंपनीनं सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना परिस्थितीची कल्पना दिली असती, तर आज ही परिस्थिती आली नसती. कर्मचाऱ्यांनी तेव्हाच काहीतरी पर्याय शोधला असता. आता अचानक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर  कर्मचाऱ्यांनी काय करावं

- तपेश कुमार, पायलट

कंपनी बंद होण्याबाबत जेटनं कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारची कल्पना दिली नव्हती. पण हळूहळू त्यांनी परीचारिकांना कमी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू सर्व सेवा बंद करण्यात आल्या. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की अखेर कंपनी बंद करण्यात आली.

तपेशनं आठवणींना उजाळा देत सांगितलं की, "आम्हाला खरंच माहीत नव्हतं की आमचं शेवटचं उड्डाण कधी असेल. आम्हाला वाटलं परिस्थिती सुधारेल. पण तसं झालं नाही. विशेष म्हणजे मुंबई-दिल्ली उड्डाणादरम्यान मी आणि सह-पायलेट यावरच चर्चा करत होतो. हे आपलं शेवटचं उड्डाण नसावं, अशी आशा आम्ही करत होतो. पण तेच खरं निघालं.” 

तपेश आता आपल्या वडिलांसोबत एव्हिएशन अकादमीत पायलट विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतो. लवकरच तो एअर एशिया या कंपनीत नोकरीसाठी जॉईन होईल. तपेशला स्पाईसजेट आणि एअर इंडिया कंपनीकडूनपण नोकरीसाठी ऑफर होती. पण त्यानं एअर एशियाची निवड केली.

तपेशला तर नोकरी मिळाली. पण बाकी कर्मचाऱ्यांचं काय? ते त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी कशी पूर्ण करणार? जेट कंपनी बंद झाल्यामुळे  २२ हजार कर्मचाऱ्यांचं भविष्य धोक्यात आहे. त्यांना त्यांचा हक्क कधी मिळणार? या सर्वांची उत्तर आजही अनुत्तरीत आहेत.



हेही वाचा

मुंबई विमानतळावरील जेटचं आॅफिसही बंद

मुंबई-जयपूर दरम्यान स्पाइसजेटची सेवा सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा