SHARE

दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) मेट्रो-7 आणि दहिसर ते डीएन नगर मेट्रो-2 अ या दोन्ही मेट्रो मार्गांवर मिळून भविष्यात तब्बल 62 मेट्रो गाड्या धावणार आहेत. त्यानुसार या मेट्रो गाड्यांच्या 376 डब्यांसाठी येत्या पंधरा दिवसांत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. एकीकडे मेट्रो-7 आणि मेट्रो-2 अ चे काम वेगात सुरू असून, आता मेट्रो डब्यांसाठीही निविदा मागवण्यात येणार असल्याने या दोन्ही मेट्रो शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याकडे एमएमआरडीएचा कल आहे. त्यानुसार 2019 मध्ये प्रकल्प पूर्ण करत मुंबईकरांच्या सेवेत या दोन्ही मेट्रो दाखल करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

मेट्रो 2 अ हा 18.6 किमी अंतराचा मार्ग असून, यासाठी 6410 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तर मेट्रो-7 हा 16.4 किमी अंतराचा मार्ग असून, यासाठी 6208 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. मेट्रो 7 मध्ये 14 स्थानके तर मेट्रो-2 अ मध्ये 17 स्थानके असणार आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामावर विशेष लक्ष ठेवून आहेत. गेल्या आठवड्यात रात्रपाळी करत मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी हे दोन्ही मार्ग 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता एमएमआरडीएनेही या दोन्ही मेट्रो मार्गाच्या कामाला वेग दिला आहे.


हेही वाचा :

मेट्रो-3 साठी मुख्यमंत्र्यांची पुन्हा रात्रपाळी !


एकीकडे मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम वेगात सुरू असताना दुसरीकडे मेट्रो गाड्या शक्य तितक्या लवकर मुंबईत दाखल करत चाचण्या घेण्याच्या दृष्टीनेही डीएमआरसीच्या माध्यमातून एमएमआरडीएने प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन्ही मार्गांवर 60 ते 62 मेट्रो गाड्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे 376 मेट्रो डब्यांसाठी येत्या पंधरा दिवसांत निविदा काढण्यात येणार आहेत. निविदा काढत निविदा अंतिम करत प्रत्यक्ष मेट्रो गाड्या येण्यासाठी वर्षभराचा काळ लागेल. त्या अनुषंगाने पंधरा दिवसांत निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या