Advertisement

चाकरमान्यांचा गणेशोत्सव गाडीतच साजरा होणार?


चाकरमान्यांचा गणेशोत्सव गाडीतच साजरा होणार?
SHARES

गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. यंदाही ती असेल, यात शंका नाही. तसाच दरवर्षी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचा अनेकदा खोळंबा झाल्याचंही चित्र पहायला मिळतं. मात्र यंदा हा खोळंबा अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पहाता रेल्वे प्रशासन या काळात जादाच्या गाड्या सोडत असते. मात्र यंदा सोडलेल्या जादा गाड्यांची संख्या पहाता कोकण रेल्वेचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होण्याची शक्यता आहे.


जादा गाड्यांचा अडथळा?

यंदा मध्य रेल्वेकडून एकूण 202 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच, पश्चिम रेल्वेनेही वांद्रे, मुंबई टर्मिनस आणि अहमदाबादहून 38 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या जादा गाड्यांची संख्या 240 झाली आहे. आणि कोकण रेल्वेचा विचार करता रोहापासून पुढे कोकण रेल्वेचा मार्ग एकपदरी आहे. त्यामुळे इतक्या जादा गाड्या एकपदरी मार्गावरुन जाताना अनेक गाड्यांवर वाटेतच तिष्ठत रहाण्याची वेळ येऊ शकते. 


दुपदरीकरणाची प्रतिक्षा संपेना!

गेल्या काही वर्षांपासून कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण हा कळीचा मुद्दा ठरला आहे. या कामाला सुरुवात झाली असली तरी, त्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या हद्दीतील पनवेल ते रोहा मार्गात पनवेल-कासू ते नागोठणेपर्यंत दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्यानंतर कोकणच्या हद्दीत रोहा ते ठेवूर पर्यंतचा मार्ग एकेरी आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणाच्या योजनेचं उद्घाटन झालं असलं, तरी कामाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. त्यामुळे जर गाड्या खोळंबल्या, तर चाकरमान्यांचा गणेशोत्सव गाडीतच साजरा होतोय की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 


एसटीचाही होणार खोळंबा?

दरम्यान, रेल्वेप्रशासनाप्रमाणेच एसटीनेही कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रस्त्यावरही चक्का जाम होऊ शकतो.

कोकण रेल्वेमार्गावर सध्या मान्सूनचे वेळापत्रक सुरू आहे. पावसाळी वातावरणात दरडी आणि झाडे कोसळून गाड्यांची वाहतूक बाधित होत असते. तसेच, कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांमध्ये यंदा ‘तेजस’ एक्सप्रेसची भर पडली आहे. कोकणात जादा गाड्या सोडण्याऐवजी राज्यराणी तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दीसारख्या गाड्यांना वेटिंग लिस्ट पाहून जादा डबे जोडण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.


मध्य रेल्वेच्या जादा गाड्यांचे आरक्षण मंगळवारपासून

मध्य रेल्वेने सीएसटीएम, एलटीटी, पनवेल आणि पुणे येथून गणपतीसाठी सोडलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण मंगळवार, 18 जुलैपासून सुरू होणार आहे. यात ट्रेन क्र. 01437, ट्रेन क्र. 01189, ट्रेन क्र. 01191, ट्रेन क्र. 01043 आणि ट्रेन क्र. 01045 यांचा समावेश आहे.


कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्या

  • मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या : 202
  • पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या : 38
  • नियमित आणि इतर गाड्या : 10
  • एकूण गाड्या : 250




हेही वाचा - 

गणेशोत्सवासाठी 'परे' च्या विशेष गाड्या


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा