PMC बँकेचे ठेवीदार RBI विरोधात आझाद मैदानात करणार आंदोलन

संतप्त झालेल्या बँक ग्राहकांनी रविवारी भांडुप येथील बैठकीत पीएमसी बँकेच्या संचालक मंडळासह रिझव्‍‌र्ह बँकेविरोधात रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके (पीएमसी बँक)तील खातेदार-ठेवीदारांना १० हजार रुपये काढण्याची मुभा रिझर्व्ह बँके (RBI)ने दिली असली, तरी बँकेत पुरेशी रोकडच उपलब्ध नसल्याने बँक ग्राहकांना हात हलवत परत यावं लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या बँक ग्राहकांनी रविवारी भांडुप येथील बैठकीत पीएमसी बँकेच्या संचालक मंडळासह रिझव्‍‌र्ह बँकेविरोधात रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच बँकेतील ठेवींना संरक्षण मिळावं या मागणीसाठी बँक ग्राहक २ आॅक्टोबरला आझाद मैदानात आंदोलन देखील करणार आहे.  

खातेधारकांची बैठक

भांडुपच्या ड्रीम्स मॉल (बँकेच्या मुख्यालयाजवळ) इथं ‘पीएमसी’ बँकेच्या खातेधारकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी, विवेक मॉन्टेरे आणि कॉ. सुगंधा फ्रान्सिस उपस्थित होत्या. 

आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. त्यानुसार खातेधारांना आधी केवळ १ हजार रुपयेच काढण्याची मुभा होती. परंतु ही मर्यादा वाढवून आरबीआयने १० हजार केली. मात्र अजूनही खातेधारकांना हे पैसे मिळू शकलेले नाही. 

निर्बंधावर चर्चा

या बैठकीत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या बंधनाविषयी चर्चा करण्यात आली. त्यातून काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. एचडीआयएल कंपनीची कर्ज फेडण्याची क्षमता नसतानाही कंपनीला २५०० कोटी रुपयांचं कर्ज का देण्यात आलं? कर्ज बुडवल्यानंतर पीएमसी बँकेने कंपनीवर काय कारवाई केली? बँकेच्या ताळेबंदात कर्जाची परतफेड होऊ शकत नसल्याने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध येऊ शकतात, याचा अंदाज घेऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर कारवाई करण्याआधी ग्राहकांना हिताचा विचार का केला नाही? अशा प्रश्नाांचा यांत समावेश होता. 

आरबीआयही जबाबदार

या बैठकीत बँक ग्राहकांची जी फसवणूक झाली आहे, त्यासाठी पीएमसी बँकेच्या संचालक मंडळासोबत रिझर्व्ह बँकही तितकीच जबाबदार असल्याचा सूर उमटला. रिट याचिकेत संचालक मंडळासह रिझव्‍‌र्ह बँकेला प्रतिवादी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सोबतच रिझव्‍‌र्ह बँकेविरोधातही आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हेही वाचा-

पीएमसी बँक प्रकरणातून घ्या 'हा' धडा, अशी करा आपली गुंतवणूक

PMC बँकेतून EMI भराल कसा? हे वाचून मिळू शकेल उत्तर...संबंधित विषय
ताज्या बातम्या