बंदवरून औषध विक्रेत्यांमध्ये फूट; 30 मे रोजी 25 हजार दुकाने खुली राहणार?

  Mumbai
  बंदवरून औषध विक्रेत्यांमध्ये फूट; 30 मे रोजी 25 हजार दुकाने खुली राहणार?
  मुंबई  -  

  केंद्र सरकारच्या ई-पोर्टल सुरू करण्याच्या निर्णयाला 'आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट' (एआयओसीडी)ने जोरदार विरोध करत 30 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. 'महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन'ही यात सहभागी होणार आहे. या बंदचा मुंबईसह राज्यातील औषध विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असताना राज्यातील अंदाजे 25 हजार फार्मासिस्ट मालकांनी या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 30 मे रोजी मुंबईसह राज्यातील अंदाजे 25 हजार दुकाने खुली राहतील, अशी माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी दिली आहे.

  औषधांच्या खरेदी-विक्री-उत्पादनावर अंकुश ठेवत बेकायदा औषध उत्पादन-खरेदी-विक्रीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ई-पोर्टलचा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केंद्राचा हा निर्णय व्यवहार्य नसून याचा फटका औषध विक्रेत्यांना बसणार असल्याचे म्हणत 'एआयओसीडी'ने 30 मे रोजी बंद पुकारला आहे. देशभरातील साडेआठ लाख औषध दुकानदार या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे 'एआयओसीडी'कडून सांगितले जात आहे.


  हेही वाचा

  औषध दुकानांचा ३० मे रोजी देशव्यापी संप


  असे असताना राज्यातील फार्मासिस्ट संघटनेने मात्र या बंदला विरोध दर्शवला आहे. ई-पोर्टलमुळे कोणाचेही कोणतेही नुकसान होणार नसून उलट फार्मसी क्षेत्रात पर्यायाने आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. शिवाय बेकायदा औषध उत्पादन खेरदी-विक्रीलाही आळा बसणार आहे. त्यामुळे ई-पोर्टलचे स्वागतच करायला हवे, अशी भूमिका 'फार्मासिस्ट असोसिएशन'ने घेत बंदलाच विरोध केला आहे.

  काही थोड्या लोकांनी बंदला विरोध केला, तरी त्याचा बंदवर काहीही परिणाम होणार नाही. बंद शंभर टक्के यशस्वी होईल. मात्र बंदच्या दिवशी रूग्णांना त्रास होऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून काही दुकाने आम्ही खुली ठेवणार आहोत. त्याची यादी 27 मे रोजी जाहीर करु.

  - जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, एआयओसीडी

  या बंदच्या मागे फार्मासिस्टची अनिवार्यता संपवून नाॅन फार्मासिस्टना फार्मासिस्टचा दर्जा देण्याचा छुपा अजेंडा असल्याचा आरोपही तांदळे यांनी केला आहे. हेच बंदमध्ये सहभागी न होण्याचे मुख्य कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभरात 60 ते 65 हजार औषध दुकाने असून त्यातील फार्मासिस्ट असोसिएशनची 20 हजार दुकाने आणि इतर फार्मासिस्ट मालकांची 5 हजार दुकाने अशी 25 हजार औषध दुकाने खुली राहतील, असेही तांदळे यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.