गटारांवरचं झाकण काढणं हा गुन्हा! वाचा का?


गटारांवरचं झाकण काढणं हा गुन्हा! वाचा का?
SHARES

गटारा(मॅनहोल)वरचं झाकण उघडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सोमवारी मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात दिली. गेल्या वर्षी पावसाळ्यात बाॅम्बे हाॅस्पिटलचे प्रसिद्ध डाॅक्टर दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेवर मॅनहोलच्या सुरक्षेवरून बरीच टीका झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात कुणीही मॅनहोल उघडू नये, म्हणून महापालिकेने संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.


कुठल्या प्रकरणात याचिका?

गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी एल्फिन्स्टन जंक्शन इथं मॅनहोल खुलं करून ठेवण्यात आलं होतं. या मॅनहोलमध्ये पडूनच डाॅ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह वरळी समुदात आढळून आला होता. त्यानंतर 'फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन'ने उच्च न्यायालयात याचिका दाखल करत शहरातील सर्व उघडी गटारे संरक्षक जाळ्यांनी बंद करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्याची विनंती केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत महापालिकेने न्यायालयाला ही माहिती दिली.


महापालिकेचं म्हणणं काय?

या प्रकरणी न्यायालयाला माहिती देताना महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे म्हणाले की, मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी ८३९ गटारे आहेत. या सर्व गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या गटारांवरील झाकण काढणे यापुढे गुन्हा ठरेल.


उच्च न्यायालयाची सूचना

कोणत्याही कारणासाठी गटारे उघडी केलीत, तर उघड्या गटारांजवळ लाल झेंडा किंवा सूचना फलक लावा. पावसाळ्यापूर्वी गटारांच्या देखभालीचं व दुरुस्तीचं काम पूर्ण करत जा. त्याशिवाय उघड्या गटारांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा,’ अशी सूचना
उच्च न्यायालयाने महापालिकेला केली.हेही वाचा-

महापालिका म्हणते १ हजार ४२५ मॅनहोल्सला बसवल्या जाळ्या

अमरापूरकर मृत्यू प्रकरण : सिंघल समितीची महापालिकेला क्लिनचिटसंबंधित विषय