मुंबईतील नालेसफाई, रस्त्यांची कामे अर्धवटच

 BMC
मुंबईतील नालेसफाई, रस्त्यांची कामे अर्धवटच

महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या पाठोपाठ खुद्द महापालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीतही नालेसफाई आणि रस्त्यांची कामे अर्धवट असल्याचे समोर आले आहे. यावरून 95 टक्के नालेसफाईचा आपलाच दावा फोल असल्याचे वास्तव प्रशासनाला नक्कीच जाणवले असेल.

मुंबईतील नाल्यांच्या सफाईचे काम 95 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मुंबईतील केवळ सात मोठ्या नाल्यांचे काम थांबलेले असून येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येईल तसेच छोट्या नाल्यांचेही कामही दोन चार दिवसांमध्ये पूर्ण होईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. सध्या या दोन्ही नाल्यांची सफाई 95 टक्के एवढी झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोरबा मिठागर नाल्यात कचरा तसाच -
मुंबईतील शहर आणि पूर्व उपनगरातील नाल्यांची पाहणी करण्यासाठी महापालिकेने पत्रकारांचा दौरा आयोजित केला होता. यामध्ये सफाई केलेल्या नाल्यांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परंतु पत्रकारांनी कोरबा मिठागर नाल्याची पाहणी करण्याची इच्छा प्रकट केल्यावर हा नाला अद्यापही साफ झाला नसल्याचे दिसून आले. प्रशासनाने हा नाला साफ झाल्याचा दावा करत यामध्ये तरंगता कचरा असल्याचे सांगितले. खाडीतून भरतीचे पाणी येत असल्यामुळे त्यातून हा कचरा येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

परंतु या नाल्याची स्थिती दोन दिवसांपूर्वीपेक्षा वेगळी नव्हती. विशेष म्हणजे या नाल्याच्या सफाईसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. तरीही नाल्याची सफाई झाली नसून बुधवारी याठिकाणी दोन-चार कामगारांच्या माध्यमातून सफाईचे काम सुरु होते. प्रत्यक्षात पोकलेन मशीनद्वारे ही सफाई होणे अपेक्षित होते.


हेही वाचा

मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते - आयुक्त अजोय मेहता

नालेसफाईच्या आरोपांचे सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्ष समर्थन

78 टक्के नालेसफाई पूर्ण, मुंबई महापालिकेचा दावा


रस्त्यांची अवस्थाही वाईट -
दरम्यान मुंबईतील काही पूर्ण झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यात आली. परंतु जी.डी.आंबेकर मार्ग, जेरबाई वाडिया रोड, वडाळा चर्च रोड आदी तीन रस्त्यांची कामे आजही सुरुच आहेत. रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मुदत 31 मेपर्यंत आहे. खुद्द रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी रस्त्यांची कामे 31 मेपर्यंत मुदत असल्याचे जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात रस्त्यांची कामे आजही सुरुच असून यावर मात्र, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे कोणतीही उत्तरे नाहीत.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यंदा मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळतील, असा दावा केला आहे. तरीही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खड्डयांची भिती वाटू लागली असून पावसात खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Loading Comments