SHARE

मुंबई महापालिकेनं अनेक अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करून पात्र कुटुंबांना पर्यायी घरं उपलब्ध करून देत त्यांचं पुनर्वसन केलं आहे. अशाच प्रकारे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणात बाधित झालेल्या कुटुंबांना एमएमआरडीएनं पर्यायी घरं देऊनही, त्या कुटुंबांनी पुन्हा त्याच ठिकाणी बांधकामं केली होती. एवढंच नव्हे, तर तब्बल २० वर्ष त्यांनी वास्तव्यही केलं. पर्यायी घराचा लाभ घेऊनही पुन्हा त्याच जागांवर घरं बांधणाऱ्या या कुटुंबांचा पर्दाफाश महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तब्बल २० वर्षांनी के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीए आणि महापालिकेची फसवणूक करणाऱ्या कुटुंबांच्या बांधकामांवर बुलडोझर चालवत येथील तब्बल ६ फूट रुंदीची पदपथाची जागा मोकळी केली.


तरीही अनधिकृत दुकानं, कार्यालयं थाटली

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एन. एस. फडके जंक्शनशेजारी मोठ्या प्रमाणात तळ अधिक एक ते तीन मजल्यांची बांधकामं मागील काही वर्षांपासून उभी होती. या सर्व गाळ्यांमध्ये ट्रॅव्हल्स कंपनी, प्रिटिंग प्रेस आदींसह अनेक प्रकारची दुकाने, तसंच कार्यालयं थाटली होती. पण या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी २० वर्षांपूर्वी हा रस्ता रुंदीकरण करताना येथील बांधकामं तोडून पात्र कुटुंबांचं पुनर्वसन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आल्याचं समोर आलं.


कारवाईनंतर जागा मोकळी

एमएमआरडीएच्या माध्यमातून पर्यायी जागा मिळाल्यानंतरही त्यांनी पुन्हा याच ठिकाणी गाळे बांधले आणि पुढे त्यावर पोटमाळे चढवत तीन मजल्यांपर्यंत वाढीव बांधकामही केलं होतं. येथील कालिमाता आणि मारुती मंदिराचा आधार घेत ही बांधकामं पुन्हा केली होती. पर्यायी जागा दिल्यानंतरही पुन्हा याठिकाणी बांधकाम झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता, दुय्यम अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता आदींनी यावर सहा दिवसांपूर्वी धडक कारवाई करून हे सर्व गाळे तोडून ती जागा मोकळी केली.


२० वर्षांपासून एमएमआरडीए, महापालिकेची फसवणूक

एन. एस. फडके जंक्शनला पश्चिम द्रुतगती महामार्गाचे रुंदीकरण करताना २० वर्षांपूर्वी ही बांधकामं तोडली होती. त्यानुसार, त्यांना पर्यायी जागा देण्यात आली होती. पण पर्यायी घरांचा, तसेच दुकानांचा लाभ घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करून बांधकामं करणाऱ्या येथील तब्बल ३० बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचं देवेंद्र कुमार जैन यांनी सांगितलं. मागील २० वर्षांपासून एमएमआरडीए आणि महापालिकेची फसवणूक करून ते याठिकाणी राहत होते. त्यामुळे त्यांना परत कोणतीही पर्यायी जागा न देता त्यांची बांधकामं तोडण्यात आली आहेत. ही बांधकामं तोडल्यामुळे सहा फूट रुंदीचा पदपथ मोकळा झाला असून याठिकाणचं सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचं जैन यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा

वांद्र्याच्या ताज हॉटेलमागील अतिक्रमणे हटवून उद्यानाची जागा मोकळी


संबंधित विषय
ताज्या बातम्या