Advertisement

'एमएमआरडीए' झोपड्यांचा भाग देणार महापालिकेला


'एमएमआरडीए' झोपड्यांचा भाग देणार महापालिकेला
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने आपला विकास नियोजन आराखडा बनवला असला, तरी या आराखड्यातून मुंबईतील कुर्ला, अंधेरी पश्चिम तसेच वांद्रे पश्चिम परिसरातील काही भाग वगळला आहे. या सर्व भागाच्या नियोजनाचे अधिकार आता मुंबई महापालिकेला देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका सुमारे १०० हेक्टर जागेचा नवा विकास आराखडा बनवत आहे.

मुंबई महापालिका मुंबईतील सर्व भागांचे 'नियोजन प्राधिकरण' असले तरी कफ परेड, बॅकबे, वांद्रे-कुर्ला संकुल, ओशिवरा, वांद्रे पश्चिम या भागांच्या नियोजनाचा अधिकार 'एमएमआरडीए'कडे आहे. त्यामुळे या भागातील विकासकामे मुंबई महापालिकेला करता येत नाहीत. म्हणून 'एमएमआरडीए'ने आपल्या परिक्षेत्रातील काही भाग सोडून देत हे भाग महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेने आपला २०१४-३४ चा विकास आराखडा बनवताना 'एमएमआरडीए'च्या ताब्यातील जागा वगळली होती. परंतु 'एमएमआरडीए'ने एच/पश्चिम भागातील वांद्रे रेक्लेमेशन, एल विभागातील मिठी नदी आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग मधील परिसर आणि के/ पश्चिम मधील एस. व्ही. रोड आणि लिंकिंग रोड मधील परिसराचा विकास आराखडा मुंबई महापालिकेला बनवण्याच्या सूचना केल्या आहेत.

अतिक्रमणमुक्त आणि जागेचा अभाव अधिक असलेल्या उच्चभ्रू वस्त्या आपल्याकडे ठेवून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपड्या वसल्या आहेत, अनधिकृत बांधकामे झाली आहेत, अशा झोपड्यांचे भाग महापालिकेच्या ताब्यात देण्याचे 'एमएमआरडीए'ने निश्चित केले आहे.

'एमएमआरडीए'च्या ताब्यातील सुमारे १०० हेक्टर जागेचा विकास आराखडा मुंबई बनवत असल्याची माहिती महापालिका विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

एच/पश्चिम भागातील वांद्रे रेक्लेमेशन, एल विभागातील मिठी नदी आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग मधील परिसर आणि के/ पश्चिम मधील एस . व्ही. रोड आणि लिंकिंग रोड या भागाचा विकास आराखडा बनवला जात असून भविष्यात या जागेचे नियोजन प्राधिकरण हे मुंबई महापालिका असेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या भागांमध्ये मुंबई महापालिकेला सेवा सुविधा पुरवता येईल, असेही त्यांनी सांगितले.


महापालिकेच्या ताब्यात येणारे क्षेत्रफळ

के- वेस्ट : ( एस.व्ही.रोड व लिंकिंग रोड मधील भाग) : ४० हेक्टर
एच/वेस्ट : (वांद्रे रेक्लेमेशन) : ५० हेक्टर
एल विभाग : ( एल.बी. एस मार्ग ते मिठी नदी मधील मार्ग) : ३० हेक्टर



हेही वाचा -

महापालिका कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय गटविम्याचा तिढा सुटला?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा