Advertisement

चिंबई, वारिंगपाडा समुद्र किनाऱ्यांचीही होणार स्वच्छता


चिंबई, वारिंगपाडा समुद्र किनाऱ्यांचीही होणार स्वच्छता
SHARES

वर्सोवा समुद्र किनारपट्टीवर निर्माण होणारा कचरा साफ करण्यास सामाजिक कार्यकर्ते अफरोझ शाह यांनी नकार दिल्यामुळे समुद्र किनारपट्टीच्या स्वच्छतेचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला. मात्र, प्रमुख समुद्र किनारपट्टींबरोबरच आता महापालिकेकडून खार-सांताक्रुझ पश्चिम येथील चिंबई आणि वारिंगपाडा या समुद्र किनारपट्टीचीही स्वच्छता केली जाणार आहे.

महापालिकेच्या एच-पश्चिम विभागातील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्र किनाऱ्यांवर जमा होणाऱ्या कचऱ्याची नियमित साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांची मुदत संपली आहे. आता महापालिकेकडून नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. या समुद्र किनारपट्टीवर सध्या स्वच्छतेसाठी कोणताही कंत्राटदार नसल्यामुळे या ठिकाणी भरतीच्या पाण्याबरोबर किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात गाळ, माती, डेब्रिजमिश्रित कचरा साचत आहे.

स्थानिक नगरसेवकांनी, तसेच नागरिकांनी केलेल्या सूचनांनुसार याठिकाणी नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. चिंबई व वारिंगपाडा समुद्र किनाऱ्यावर जमा होणाऱ्या मुख्यत्वे गाळ, माती, डेब्रिज मिश्रित कचरा जमा करून त्याची विल्हेवाट डम्पिंग ग्राऊंडमध्ये लावण्यात येणार आहे.


वर्सोवा बीचची स्वच्छता आता अधिक चांगली

मुंबईतील गिरगाव, शिवाजीपार्क, दादर, जुहू आदी चौपाटींप्रमाणेच वर्सोवा समुद्र किनारपट्टीची स्वच्छता राखण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कंत्राटदारामार्फत सफाई होत असून शनिवार आणि रविवारच्या दिवशी स्वयंसेवी संस्थांमार्फत अफरोझ शाहही याठिकाणी साफसफाई मोहीम राबवत असत. परंतु, त्यांना विरोध झाल्यामुळे ही सफाई मोहीम थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. परंतु, याठिकाणी साफसफाई करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक झाली असल्यामुळे याचा फारसा परिणाम होत नसल्याचे के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सध्या वर्सोव्याच्या १ कि.मीच्या पट्टयात स्वच्छता राखली जात आहे. परंतु, या कंत्राटात बदल करून दीड कि.मी अंतराच्या परिसरात ही स्वच्छता राखण्याच्या सूचना घनकचरा विभागाला दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.हेही वाचा

अफरोज शाह यांच्या एका ट्वीटनं यंत्रणा हलली, वर्सोवा बीचवरचे कचऱ्याचे ढीग सफाचट!


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा