Advertisement

कामगार भरतीचा निर्णय १५ ऑक्टोबरपर्यंत

महानगरपालिका कामगार विभागाच्या वतीने कामगार भरतीबाबतची संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम अंतीम टप्प्यात असून याबाबतचा योग्य तो निर्णय १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत महापालिका प्रशासन घेणार असल्याचं महापालिका प्रशासनाने कळवले आहे.

कामगार भरतीचा निर्णय १५ ऑक्टोबरपर्यंत
SHARES

मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १३८८ कामगारांच्या परीक्षेचा निर्णय येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल, असं प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. या परीक्षेबाबत १५ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेणं अपेक्षित होतं. परंतु, याचा निर्णय घेण्यात विलंब होत असल्यामुळे अनेक उमेदवारांकडून याबाबत विचारणा होत होती. त्यामुळे प्रशासनाने याबाबत खुलासा करत १५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं कळवलं आहे.


इतके उमेदवार उत्तीर्ण

मुंबई महापालिकेतील कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल आया आणि स्मशान कामगार आदी पदांसाठी १३८८ कामगारांची भरती सरळ सेवेद्वारे करण्याचा निर्णय घेऊन ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलं होतं. यासाठी एकूण २ लाख ८७ हजार उमेदवारांनी अर्ज केलं होतं. परंतु, यापैकी परीक्षेला २ लाख ४२ हजार उमेदवार बसले होते. पण यासर्व उमेदवारांमधून १ लाख ६ हजार १९३ उमेदवार हे उत्तीर्ण झाले होते.


पुढील प्रक्रिया 'ही' संस्था करणार

या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ५० गुणांची आवश्यकता होती. त्यामुळे ५० गुण आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून हे सर्व उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या भरतीबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर याला सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर ही स्थगिती मागे घेतल्यानंतर याची पुढील प्रक्रिया महापालिकेने नियुक्त केलेल्या महाऑनलाईन या संस्थेस करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


प्रक्रिया अंतिम टप्प्यात

महानगरपालिका कामगार विभागाच्या वतीने कामगार भरतीबाबतची संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम अंतीम टप्प्यात असून याबाबतचा योग्य तो निर्णय १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत महापालिका प्रशासन घेणार असल्याचं महापालिका प्रशासनाने कळवले आहे. याबाबतीत इच्छुक उमेदवार वारंवार पालिकेच्या संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी/भ्रमणध्वनीवरून विचारणा करत असतात. यामुळे हा खुलासा करण्यात येत असल्याचंही पालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.


हेही वाचा - 

बीएमसीतील २४७ दुय्यम अभियंत्यांच्या भरतीला मंजुरी

कामगार भरतीची कटऑफ लिस्ट ८० टक्क्यांवर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा