Advertisement

स्वच्छ भारत अभियान फक्त नावापुरतेच, सरकारी कार्यालयातच अस्वच्छता!


स्वच्छ भारत अभियान फक्त नावापुरतेच, सरकारी कार्यालयातच अस्वच्छता!
SHARES

भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान मोठा गाजावाजा करत सुरू केलं. प्रत्यक्षात मात्र सरकारी कार्यालयेच या अभियानापासून वंचित राहिल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहाच्या शेजारीच असलेले जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय याचेच वास्तवदर्शी उदाहरण आहे. मुंबई उपनगरातील एकूण ४५ ग्रंथालये याच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येतात. परंतु, हीच इमारत सध्या पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत घाणीचे साम्राज्य उपभोगत आहे.


विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधाच उपलब्ध नाहीत

१९९९ पासून कार्यरत असलेले हे ग्रंथालय महाराष्ट्र सरकार प्रणित असून मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत १ रुपया इतक्या नाममात्र भाडे तत्वावर कार्यरत आहे. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे १९९९ पासून एकदाही या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहे. या ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत मुंबई उपनगरासोबतच कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे इथून देखील दररोज ५० ते ६० विद्यार्थी हजेरी लावतात. परंतु या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही विशेष अशी सोय इथे उपलब्ध नाही. या विद्यार्थ्यांना साधी जेवणासाठी स्वतंत्र अशी जागा देखील या इमारतीत नाही.

ही इमारत जेव्हापासून या संस्थेला देण्यात आली, तेव्हापासून त्या संस्थेने या इमारतीकडे लक्षच दिलेले नाही. ही त्यांचीच जबाबदारी होती. पुढील आर्थिक वर्षात या संस्थेसाठी आर्थिक तरतूद केली जाईल.

किशोर गांधी, अतिरिक्त आयुक्त, टी वॉर्ड, मुलुंड 


स्वच्छतेचे तीन तेरा

गंभीर बाब म्हणजे या कार्यालयात फक्त एकूण ४ कर्मचारी कार्यरत आहेत आणि इथे एकही स्वच्छता कर्मचारी नाही. त्यामुळे स्वच्छतागृह अत्यंत गलिच्छ अवस्थेत असून इथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आहे, पण ती दूषित! येथील विद्यार्थ्यांना काहीच दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या जागेत अळ्या सापडल्या होत्या. इमारतीच्या पिलरला गेलेले तडे, इमारतीच्या आवारात सापडणाऱ्या दारूच्या फुटक्या बाटल्या, इमारतीची एकूण स्वच्छता या सर्व बाबी येथील ढोबळ कारभाराची साक्षच देतात.

सरकारी लालफितीचा कारभार आणि कामकाजातील एकंदर अनास्था यामुळे या ग्रंथालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. संस्था राज्य सरकारची असल्याने महानगरपालिका म्हणते की, ही राज्य सरकारची जबाबदारी आणि ग्रंथालय प्रशासन म्हणते की ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि निव्वळ या व्यर्थ चर्चेपोटी नुकसान मात्र ग्रंथालयाचे आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचे होत आहे.

भरत अमेसर, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, ईशान्य मुंबई 

या ग्रंथालयात जेवणासाठी स्वतंत्र जागा, तसेच उत्तम स्वच्छतागृह तर असावेच. परंतु, या ग्रंथालयाची १० ते ५ पर्यंतची वेळ वाढवून ९ पर्यंत करावी, अशी मागणी येथील विद्यार्थी विठ्ठल पाटील याने केली आहे.



हेही वाचा

नैसर्गिक विधीसाठी जायचं कुठं? प्रेमनगरच्या रहिवाशांचं शौचालयासाठी 'टमरेल' आंदोलन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा