Advertisement

सिद्धी साई इमारत दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करा- रवी राजा


सिद्धी साई इमारत दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करा- रवी राजा
SHARES

घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर केला. परंतु या अहवालामध्ये केवळ अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सुनिल शितपलाच जबाबदार धरत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना क्लिनचिट दिली आहे. त्यामुळे या चौकशी अहवालावरच संशय व्यक्त होत असून याची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


'अधिकाऱ्यांना वाचवले जाते'

घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुर्घटनेत तब्बल १७ जणांचा जीव गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या इमारतीतील कुटुंबांवर यामुळे बेघर होण्याची वेळ आली आहे. आपल्या आप्तांना, तसेच सग्यासोयऱ्यांना त्यांना गमावावे लागले. परंतु महापालिकेने नियुक्त केलेल्या विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली चौर व चिठोरे यांच्या समितीने केवळ अनधिकृत बांधकाम करणाऱ्या शितपलाच जबाबदार धरले आहे. महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक तसेच तत्कालीन एन विभागाचे कार्यकारी अभियंता, इमारत विभागाचे सहायक अभियंता तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या इमारतीतील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले नाही, असे नमूद करत त्यांना वाचवण्याचे काम केले आहे.


'शितपबरोबरच अधिकारीही जबाबदार'

मुळात २००९ला सुनिल शितपने वापरात बदल आणि बांधकामासाठी अर्ज केला होता. परंतु, त्यानंतर त्यांनी कोणताही अर्ज केला नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु याठिकाणी सुमारे १८ ते २० दिवस बांधकाम सुरु होते, याची कोणत्याही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती, असे म्हणणे चुकीचे असून महापालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच शितपने हे अनधिकृत बांधकाम करण्याची हिंमत दाखवली आहे. तसेच महापालिकेचे अधिकारी आपल्या खिशात असल्याचे शितप वारंवार सांगत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येते. त्यामुळे या बांधकामाला शितप सोबत महापालिकेचे अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.


'अधिकाऱ्यांना निलंबित करा'

क्लिनचिट देताना अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचीही शिफारस या चौकशी समितीने केली आहे. त्यामुळे चौकशी सुरु करण्यापूर्वी सर्वप्रथम या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. तसेच चौकशी ही नि:पक्षपाती न झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशीही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांमार्फत केली जावी, अशी आपण निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती गठित करून एक महिन्यात या प्रकरणातील सत्य समोर आणावे, अशी मागणीही राजा यांनी केली.



हेही वाचा

'डिस्चार्ज घेऊन आम्ही जायचं कुठे?' घाटकोपर इमारत दुर्घटनाग्रस्तांचा सवाल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा