Advertisement

कारवाईच्या चक्रात फेरीवाल्यांची दिवाळी अंधारात!


कारवाईच्या चक्रात फेरीवाल्यांची दिवाळी अंधारात!
SHARES

मुंबईतील फेरीवाले हे कोणाला हवेत तर कोणाला नकोत. सर्वसामान्य गरिबांना फेरीवाले हे मॉल्स आणि शॉपिंग सेंटरच्या तुलनेत परवडणारे असले, तरी यंदाच्या दिवाळीत या फेरीवाल्यांचेच दिवाळे निघाले आहे. नोटबंदी, जीएसटी आणि त्यापाठोपाठ आता चारही बाजूंनी होणारी कारवाई लक्षात घेता फेरीवाल्यांचा धंदाच चौपट झाला आहे. दिवाळीच्या सणात वर्षभराची कमाई होत असल्यामुळे व्याजी पैसे घेऊन माल भरणाऱ्या या फेरीवाल्यांना दिवाळीत धंदाच लावणेच अवघड झाले आहे. त्यामुळे  धंदा करावा तर कसा? हाच प्रश्न आता फेरीवाल्यांसमोर आ वासून उभा आहे. 

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी आणि  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अधिक कडक करण्यात आली. रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर तशी दिवाळीपूर्वी कारवाई करण्यात येते. पण नंतर दिवाळीत फेरीवाल्यांना बसू दिले जाते. परंतु, यावेळी मुंबईतील सर्वच फेरीवाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक कारवाई हाती घेतली आहे. दर गुरुवारी परिमंडळातील सर्व अतिक्रमण पथके एकत्र करून एका प्रभागात कारवाई करण्यात येते. आता त्यातच राज ठाकरे यांनी इशारा दिल्यामुळे चारही बाजूंनी कारवाईची मोहीम राबवली जात असून रेल्वे आणि महापालिका यांना 'सेट' करण्याचे फेरीवाल्यांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत कारवाई सुरू असल्यामुळे फेरीवाल्यांना धंदा करता येत नाही.


कामगारांचा पगार देण्यापुरताही धंदा नाही!

कारवाई होत असल्यामुळे सर्वच फेरीवाले भीतीच्या छायेखाली आहेत. फेरीवाल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी नोटबंदी, नंतर जीएसटी आणि ऐन दिवाळीत महापालिका-रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई यामुळे दिवाळीत धंदाच बसला आहे. दिवाळीच्या सणात वर्षभराची कमाई करण्याची संधी असते. व्याजाने कर्ज काढून जास्तीत जास्त माल भरला जातो. तसा माल या दिवाळीलाही भरला आहे. पण सकाळपासून रात्रीपर्यंत असलेल्या कारवाईमुळे ५ टक्केही धंदा होत नाही. त्यामुळे कामगारांचा दिवसाचा 300 ते 500 रुपयांचा पगार देण्यापुरताही पैसा हातात येत नसल्याने आपण मोठ्या आर्थिक संकटात अडकल्याचे फेरीवाले सांगताहेत. 


कर्ज काढून भरला दिवाळीसाठी माल

'ईदच्या दिवसांमध्ये जर कोणती कारवाई फेरीवाल्यांवर होत नाही, तर मग दिवाळीत का होते? त्यामुळे महापालिका आणि रेल्वेकडून जी कारवाई होत आहे, ती दिवाळीच्या दिवसात होऊ नये हीच आमची मागणी आहे. आम्ही कर्ज काढून माल भरला आहे, तेवढा विकू द्या, मग कारवाईला आम्ही पूर्ण सहकार्य करू' असे फेरीवाऱ्यांकडून सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून ५० मीटर परिसरात फेरीवाल्यांनी बसू नये, असे आदेश दिले आहेत. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही या आदेशाचे पालन करण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत. त्यामुळे या हद्दीबाहेर तरी आम्हाला धंदा करू द्या, अशी मागणी फेरीवाल्यांकडून केली जात आहे. 


आधी कायद्याची अंमलबजावणी करा, मगच कारवाई

फेरीवाला हा गरीब कष्टकरी आहे. दिवाळीच्या सणात चार पैसे जास्त कमावता येतात म्हणून त्यांनी कर्ज काढून माल भरला. पण आज कारवाईमुळे कर्ज काढून घेतलेला माल विकता येत नाही. मग या गरीब कष्टकऱ्यांनी काय करावे? असा सवाल मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला आहे. महापालिकेने, फेरीवाल्यांवर जरूर कारवाई करावी. परंतु आधी कायदा बनवून त्याची योग्य ती अंमलबजावणी तरी करावी. परंतु कायद्याची अंमलबजावणी न करता थेट फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. हा प्रकार अन्यायकारक असल्याचेही राव यांनी म्हटले आहे.


दुकानदारांच्या धंद्यावरही परिणाम

एरवी फेरीवाल्यांच्या नावाने बोटे मोडणाऱ्या दुकानदारांनाही फेरीवाल्यांवरील कारवाई नको आहे. फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे खरेदीसाठी लोक येत नसल्याने दुकानदारच आता फेरीवाऱ्यांना धंदा लावण्यास सांगत आहे. दादरमधील एका दुकानदाराने नाव न लिहिण्याच्या अटीवर बोलताना असे सांगितले की, फेरीवाले नसतील तर आमच्या दुकानात कोणी येत नाही. फेरीवाल्यांकडे येणारे ग्राहक मग दुकानतही डोकावून जातात. त्यामुळे आमचाही काही धंदा होतो.


काय सांगते आकडेवारी?

  • दोन वर्षांपूवी केलेल्या सर्व्हेत अर्ज वाटप : १ लाख २८ हजार
  • स्वीकारले गेलेले फेरीवाल्यांचे अर्ज : ९९ हजार
  • टाटाने केलेल्या सर्व्हेतील फेरीवाले : १ लाख ०८ हजार
  • मुंबईच्या लोकसंख्येच्या अडीच टक्का फेरीवाले : सुमारे तीन लाख



हेही वाचा

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?

तर, फेरीवाले आपली स्टाईल दाखवतील - शशांक राव


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा