Advertisement

तर, फेरीवाले आपली स्टाईल दाखवतील - शशांक राव


तर, फेरीवाले आपली स्टाईल दाखवतील - शशांक राव
SHARES

अनधिकृत फेरीवाल्यांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई व्हावी. उगाच त्यांना त्रास देऊन त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न करू नये, तसं झाल्यास कष्टकऱ्यांची स्टाईल दाखवली जाईल, अशा शब्दांत मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी मनसेला अप्रत्यक्ष इशारा दिला.

मुंबईतील फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या असून या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी १ नोव्हेंबर २०१७ रोजी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राव यांनी पत्रकार परिषदेतही केली.


फेरीवाला धोरण राबवण्यात अपयशी

१९८५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही २०१३ पर्यंत तब्बल २८ वर्षे फेरीवाल्यांना संरक्षण देण्यासाठी कोणतेही नियम व कायदे बनवण्यात आले नाहीत. त्यानंतर २०१३ ला जोपर्यंत फेरीवाल्यांसाठी कायदा बनत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांसाठी बनवलेली २०१० च्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात यावी व कायदा बनल्यानंतर फेरीवाला धोरण राबवण्यात यावं, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.


आधी कायद्याची अंमलबजावणी करा

केंद्र सरकारने २०१४ मध्ये पदपथावर विक्री करणाऱ्यांसाठी अधिनियमात सुधारणा केली. परंतु या कायद्याची शासनाने आजतागायत अंमलबजावणी केलेली नाही. उलट फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आधी कायद्याची अंमलबजावणी करा, मगच फेरीवाल्यांवर कारवाई करावी, असा इशाराही राव यांनी दिला.


फेरीवाले घटले कसे?

मुंबईत सध्या ९९ हजार फेरीवाले अधिकृत असल्याचे म्हटले जात आहेत. यांत रेल्वेतील फेरीवाल्यांचा समावेश नाही. २००२ मध्ये 'टाटा सामाजिक संस्थे'ने केलेल्या सर्व्हेत मुंबईत एकूण १ लाख ८ हजार फेरीवाले असल्याचे म्हटले होते. मग फेरीवाल्यांच्या संख्येत एवढी घट कशी झाल? असा सवाल शशांक राव यांनी उपस्थित केला.


'या' मागणीसाठी

मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्का फेरीवाल्यांना रस्त्यावर बसून धंदा करण्याचा अधिकार आहे. त्यांना कसे व कुठे बसवायचे? याचे काम प्रशासनाचे आहे. परंतु प्रशासनच जाणीवपूर्वक कायद्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे फेरीवाल्यांवर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया त्वरीत थांबवण्यात याव्यात आणि फेरीवाल्यांसाठी २०१४ मध्ये बनवलेल्या पदपथ अधिनियमांची अंमलबजावणी त्वरीत करून सर्व फेरीवाल्यांची नोंदणी करावी आणि त्यांना परवाने द्यावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे शशांक राव यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा -

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?

रस्त्यावरून चालणारा मराठी नसतो का? - राज ठाकरे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा