रस्त्यावरून चालणारा मराठी नसतो का? - राज ठाकरे


SHARE

मुंबईतील फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी १५ दिवसांची मुदत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी आपला मोर्चा महापालिकेकडे वळवत आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना तातडीनं हटवण्यासंदर्भात महापालिका काय कारवाई करतेय याचा आढावा घेतला. 

मुंबईत अधिकृत फेरीवाल्यांच्या तुलनेत अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. तेव्हाच मुंबईकरांना चालण्यास मोकळे पदपथ मिळतील. फेरीवाल्यांमध्ये मराठी माणूस असल्याचं सांगितलं जातं. मग रस्त्यांवरून चालणारा माणूस मराठी नसतो काय? असा प्रश्न राज यांनी यावेळी उपस्थित केला.


'तक्रारीसाठी व्हॉट्सअॅप नंबर'

फेरीवाल्यांवर कडक कारवाई व्हावी, सर्वसामान्यांना फेरीवाल्यांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर देण्याची मागणी यावेळी राज यांनी केली. ही मागणी आयुक्तांनी मान्य केली. महापालिकेच्या कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा त्याच जागी येऊन बसतात. त्यांच्यावर सतत कारवाई केल्यास मुंबई फेरीवालामुक्त करता येईल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर चर्चा करताना राज यांच्यासोबत मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे उपस्थित होते.  
'हद्दीचा वाद सोडवा'

फेरीवाल्यांवर कारवाई करताना अनेकदा रेल्वे आणि महापालिकेत हद्दीवरून वाद होतो. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी रेल्वे महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन हद्दीचा वाद सोडवण्याची सूचनाही राज यांनी केली. त्यानुसार रेल्वेसोबत हद्द ठरवून महापालिका आणि रेल्वेच्या माध्यमातून फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही मेहता यांनी दिल्याचं राज यांनी पत्रकारांना सांगितलं.


तरच लोकं बाजारात जातील...

कुणाचा रोजगार जावा म्हणून आम्ही ही मागणी करत नाही. जो करदाता आहे, त्याला रस्त्यांवरून चालता यावं, यासाठी हा लढा आहे. या करदात्यांमध्ये मराठी माणूसही आहे. रस्त्यांवर फेरीवाले बसतात म्हणून लोकं त्यांच्याकडून वस्तू खरेदी करतात. पण फेरीवाले रस्त्यांवर बसलेच नाही, तर हेच लोक बाजारात जाऊन खरेदी करतील, याकडेही राज यांनी लक्ष वेधलं.

महापालिका आयुक्तांकडे मांडलेली संकल्पना मी रेल्वेच्या महाव्यवस्थपकांकडेही मांडणार आहे. या कारवाई वजा मोहिमेत नागरिकांचाही तेवढाच सहभाग आणि जागरूकता अपेक्षित असल्याचं राज म्हणाले.


मनसेचे नगरसेवक गैरहजर

महापालिकेत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु, राज ठाकरे महापालिका मुख्यालयात आल्यानंतर केवळ गटनेते दिलीप लांडे आणि माटेगावकर हे दोनच नगरसेवक हजर होते. इतर सर्व नगरसेवकांनी चक्क दांडी मारली होती. लांडे यांना सकाळीच साहेब महापालिकेत येणार असल्याचा निरोप मिळाल्यानं ते आवर्जून उपस्थित होते. हेही वाचा - 

फेरीवाल्यांनो, १६ वा दिवस धोक्याचा!

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय